अजित पवारांचा माझ्यावर राग का? त्यासाठी कमिटी नेमावी लागेल, सत्तारांचा टोला
औरंगाबाद : आपल्यावर अजित पवार यांचा 1999 पासून राग आहे. पण अजित पवार माझ्यावर का रागवतात? यासाठी एखादी कमिटी नेमावी लागेल, त्यातून कमिटी सांगेल की त्याची ही कारणं आहेत, त्याच्यावर मी निश्चित विचार करेल, असा टोला कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी लगावला आहे. त्याचबरोबर प्रत्येक निवडणुकीत मी त्यांना मदत मागितली तरी त्यांनी मला कधीही मदत केली नाही, मला पाडण्याचा प्रयत्न केला पण मी निवडून आलो. प्रत्येकवेळी मी निवडून येतो पुढेही निवडून येईल, माझ्यावर आरोप झाल्यानंतर माझे 25 हजार मतदार वाढल्याचेही यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे.
आमच्या पक्षात चाळीसच्या चाळीस आमदार एकदिलानं काम करत आहोत, पण त्यात एखादा अजात शत्रू असू शकतो, असा पुन्हा एकदा आरोप कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. आम्ही चाळीस आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली काम करत असल्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. आमचे काही चुकले तर एकनाथ शिंदे आमचे कान धरु शकतात.
राजकारणामध्ये एक पुढारी जाणार नाही तोपर्यंत दुसरा कोणी त्या ठिकाणी येत नाही त्यामुळे आपल्याला कोणीतरी बाजूला करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका मंत्री सत्तार यांनी केली. हे सर्वावरुन आपल्याच पक्षातील नेत्यांवर त्यांनी टीका केली आहे. प्रत्यक्षपणे कोणाचं नाव जरी ते घेत नसले तरी त्यांच्या जाण्यानंतर कोणाला फायदा होणार हे सर्वांना माहिती आहे.
मंत्री सत्तार यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर ते म्हणाले की, आपण ही जमीन ज्या 19 परिवारांना दिली, त्यांना राहायला घर नाही. ते हालाकीचं जीवन जगत आहेत. मी एखाद्या धनदांडग्याला, कंपनीवाल्याला दिली असती आणि माझ्यावर आरोप झाले असते तर मला काही वाटलं नसतं पण ज्यांना जमीन दिली त्यांची परिस्थिती जाऊन पाहा मग तुम्हाला कळेल.
आपण या गरिब नागरिकांसाठी जे काम केलं त्याच्यासाठी मला न्यायालय जी शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे. माझ्या स्वपक्षीयांना सांगू इच्छितो की, मला चांगले काम करु द्या, जोपर्यंत मी तुमचा मित्र आहे त्याचा फायदा सरकारचा मंत्री म्हणून मला देऊद्या, माझं काही चुकलं तर माझे कान धरण्याचा अधिकार आपण त्यांना देतो असेही सांगितले.