राष्ट्रवादीने नाही पण विखेंनी मदत केली; तांबेंनी सांगितले झेडपीचे राजकारण
अहमदनगरः काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी लेट्सअप सभा कार्यक्रमात दिलखुलास मुलाखत दिली. ते जिल्हा परिषदेचे दोनदा सदस्य होते. पहिल्यांदा सदस्य झाल्यावर अध्यक्षपदाची संधी कशी हुकली, दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदाची संधी कशी हुकली, कोणी मदत केली, कोणी कसे राजकारण केले हे सर्व त्यांनी सांगितले.
मी पहिल्यांदा २००७ मध्ये जिल्हा परिषद सदस्य झालो. त्यावेळी सर्व सदस्यांची अपेक्षा होती की मी झेडपीचे अध्यक्ष व्हावे. माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्याबरोबर नगरमधील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. सव्वा वर्ष शालिनी विखे पाटील, त्यानंतर सव्वा वर्ष मी अध्यक्ष होणार असे ठरले होते. अडीच वर्षानंतर पक्षाने मला अधिकृतपणे उमेदवारी दिली होती. परंतु शालिनी विखे पाटील सेना, भाजपच्या सदस्याच्या मदतीने अध्यक्ष झाल्या. शेवटी बहुमताचा विषय असतो. तेही ही मान्य केले, असे तांबे यांनी सांगितले.
२०१२ मध्ये उपाध्यक्षपदाची संधी हुकल्याबाबत सत्यजीत तांबे म्हणाले, २०१२ मध्ये मी पुन्हा जिल्हा परिषद सदस्य झालो. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त सदस्य निवडून आले. अध्यक्षपद राष्ट्रवादीला, उपाध्यक्षपद काँग्रेसला असे ठरले होते. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी मला उपाध्यक्षपद देण्याचे ठरवले.
मुख्यमंत्री चव्हाण यांनी मला फोन करून राधाकृष्ण विखे यांना भेटण्यास सांगितले. मी विखे यांना भेटलो. त्यावेळी सुजय विखे उपस्थित होते. त्यावेळी ते राजकारणात आले नव्हते. माझ्यावर आरोप होता की मी शिर्डी मतदारसंघात जास्त लक्ष घालतो. त्या मतदारसंघात माझे जन्मगाव आहे. संगमनेरमधील गावे तिकडे आहेत. मी तरुण असल्याने माझ्यावर अन्याय झाला असे मला वाटत होते. परंतु हळहळू राजकारण शिकलो. त्यावेळी आमच्यातील वाद मिटला.
राधाकृष्ण विखे यांनी निवडणुकीत कशी मदत केली याबाबत ते म्हणाले, विखेंनी मला उपाध्यक्ष करण्यास मान्यता दिली. त्यांनी स्वतः फॉर्म भरला. राष्ट्रवादी काँग्रेसने लंघे बिनविरोध अध्यक्ष झाले. उपाध्यक्षपदासाठी माझी वहिनी मोनिका राजळे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. मी निवडणुकीतून माघार घेणार होतो. पक्षाने माघार न घेण्याचा आदेश दिला. कृषिमंत्री असलेले राधाकृष्ण विखे यांनी आमचे सदस्य राहुरी कृषी विद्यापीठात नेले. त्यांनी मदत केली. पण दुर्देवाने राष्ट्रवादीने मदत केली नाही. ही संधी माझी गेली, असे सत्यजीत तांबे यांनी सांगितले.