Satyajeet Tambe यांच्या विजयानंतर मामा-भाचे यांच्या दोन जोड्या विधिमंडळात
पुणे : सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांच्या विधान परिषदेतील विजयानंतर ते आता त्यांचे मामा बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यासोबत विधिमंडळात दिसणार आहे. थोरात हे विधानसभेत आणि तांबे हे विधान परिषदेचे आमदार अशी मामा-भाच्याची जोडी विधिमंडळात दिसेल. अर्थात आमदार असलेली मामा-भाच्याची ही दुसरी जोडी आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि त्यांचे भाचे प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) २०१९ पासून विधानसभेत एकत्र आहेत. हे दोघे एकाच पक्षाचे आहेत.
सत्यजीत यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. त्यांचा पक्ष कोणता राहील, याची उत्सुकता असणार आहे. त्यांना काॅंग्रेसमधून निलंबित केल्याने ते मामांसोबत असणार की त्यांच्या विरोधी पक्षात, याबाबत त्यांनी निर्णय घेतलेला नाही. सत्यजीत यांच्या पूर्ण निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी मौन बाळगले. आता निवडणूक संपल्यानंतर तरी ते भाष्य करणार का, याची उत्सुकता आहे. बाळासाहेब थोरात यांच्या भाचेसून म्हणजे मोनिका राजळे या देखील विधानसभेत आहेत.
विधिमंडळात मामा-भाच्यांच्या जोड्याशिवाय अनेक नातेवाईकही आमदार म्हणून कार्यरत आहेत. यात महत्वाची जोडी म्हणजे ठाकरे पिता-पुत्र. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधान परिषदेत तर त्यांचे पुत्र आदित्य हे विधानसभेत आहेत. वडिल मुख्यमंत्री आणि मुलगा त्यांच्याच मंत्रिमंडळात मंंत्री, हे पहिले उदाहरणही त्यांनीच घालून दिले होते. वडील व मुलगा एकाच सभागृहात म्हणजे विधानसभेत असल्याची नोंद ही हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी केली. नगरचे आमदार संग्राम जगताप आणि त्यांचे वडिल अरुणकाका हे पण अनुक्रमे विधानसभा आणि विधान परिषद येथे एकाच वेळी सदस्य होते. अरुणकाका यांची मुदत संपल्याने ते गेल्या वर्षी निवृत्त झाले. दोन सख्खे भाऊ देखील विधानसभेत आहेत. ते म्हणजे लातूरचे अमित देशमुख आणि धीरज देशमुख. सख्खे बहिण-भाऊ देखील विधिमंडळात आहेत. माजी राज्यमंत्री आदिती तटकरे या विधानसभेत आणि त्यांचे बंधू अनिकेत हे विधान परिषदेत आहेत. बबनदादा शिंदे आणि संजयमामा शिंदे या बंधूंचीही जोडी एकाच वेळी सध्या विधानसभेत आहे.
सासरे आणि जावई यांच्या दोन जोड्या विधिमंडळात आहेत. विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर आणि त्यांचे सासरे रामराजे निंबाळकर ही पहिली जोडी. विधान परिषदेचे माजी सभापती राहिलेले रामराजे हे राष्ट्रवादीचे नेते आहेत. सासरे राष्ट्रवादीचे आणि जावई भाजपचे असा हा योग आहे. दोघांनीही पीठासीन अधिकारी होण्याची संधी मिळणे हा दुर्मिळ योगही त्यांच्याबाबतीत घडून आला. बबनदादा शिंदे यांच्यासोबत त्यांचे जावई संग्राम थोपटे हे पण विधानसभेत कार्यरत आहेत.
चुलते आणि पुतण्यांच्याही दोन जोड्या विधिमंडळात आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार आणि कर्जतचे आमदार रोहित पवार. कोल्हापूरातील सतेज पाटील हे विधान परिषदेत तर त्यांचा पुतण्या ऋतुराज पाटील हे विधानसभेत आहेत. माजी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे मावसबंधू विक्रम सावंत हे एकाच वेळी विधानसभेत आहेत. व्याह्यांची जोडीही विधीमंडळात होती. ते म्हणजे माजी राज्यमंत्री रणजित पाटील हे विधान परिषदेत तर त्यांचे व्याही म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे आमदार प्रताप सरनाईक. पण पाटील हे विधान परिषद निवडणुकीत पराभावाच्या छायेत असल्याने ही जोडी तुटण्याची शक्यता आहे.