भाई जगताप यांना हटवून वर्षा गायकवाड अध्यक्ष, जगताप यांची गच्छंती का?

भाई जगताप यांना हटवून वर्षा गायकवाड अध्यक्ष, जगताप यांची गच्छंती का?

मुंबई — प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) : मुंबई काँग्रेसचे (Congress)अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap)यांची उचलबांगडी झाली आहे. त्यांच्या जागी नव्या अध्यक्ष म्हणून माजी मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांची वर्णी लागली. त्यामुळं त्या मुंबई कॉंग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या. गेल्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा झालेला पराभव आणि काँग्रेसमध्ये असलेल्या अंतर्गत वादाचा फटका भाई जगताप याना बसल्याचे बोलले जाते आहे. (Bhai Jagtap removed and Varsha Gaekwad Mumbai Congress President)

मुंबई काँग्रेसमधील अतंर्गत वाद अनेकदा चव्हाट्यावर आला. गेल्या काही दिवसापासून पक्षात सुरु असलेली धुसपूस काल स्पष्टपणे समोर आली. काँग्रेसमध्ये भाई जगताप अध्यक्ष झाल्यापासून मिलिंद देवरा, अमिन पटेल, कामत ग्रुप मधील सुरेश शेट्टी, नसिम खान तर दुसरीकडे, चंद्रकांत हंडोर, बाबा सिधीकी, संजय निरुपम यांच्यात कधी सुसुत्र जुळले नाहीत. भाई जगताप आणि मुंबई कॉंग्रेसच्या अन्य नेत्यांमध्ये अनेकदा खडाजंगी झाली. निरुपम विरुध्द जगताप हा संघर्ष कॉंग्रेसमध्ये पाहायला मिळाला. भाई यांचा एकला चलो रे भूमिका ही अनेकाना खटकणारी होती. गेल्या अनेक दिवसापासून त्यांच्यविषयी दिल्ली दरबारी तक्रारी सुरु होत्या. अखेर काल जगताप यांना हटवून वर्ष गायकवाड यांना अध्यक्षपदी बसवण्यात आले.

WTC Final : लबुशेन डगआऊटमध्ये झोपला, सिराजच्या चेंडूने उडवली झोप, पहा व्हिडिओ

सत्ता जाऊनही काँग्रेसमध्ये गट-तट तीव्र
काँग्रेस एकेकाळी मुंबईत महापालिकेची सत्ता ताब्यात असलेला पक्ष होता. २०१४ पुर्वी मुंबईतले सहाही खासदार काँग्रेसचेच होते. पण गट-तट यातून काँग्रेस बाहेर पडू शकली नाही. त्याकाळी दिवंगत मुरली देवरा, दिवंगत एकनाथ गायकवाड , दिवंगत गुरुदास कामत आणि कृपा शंकर सिंह असे मोठे गट होते. एक गटाचा अध्यक्ष झाला की उरलेले पुन्हा तीन गट तक्रारीचा पाढा दिल्ली दरबारी घेऊन जात. ही परंपरा अजूनही कायम आहे. भाई जगताप यांच्याकडे अध्यक्षपद यावं यासाठी लॉबिंग करणारे आज त्यांच्या विरोधात गेल्याने भाई जगताप यांचे अध्यक्षपद गेले आहे.

भाई जगताप याना का गमवावे लागले अध्यक्षपद?
भाई जगताप यांची गच्छंती करून वर्षा गायववाड यांची कॉंग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदावर निवड झाली. दरम्यान,
जगताप यांना पदावरून हटवल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क लढवले जात आहेत.

मुंबईत भाजपला टक्कर देणारा आक्रमक चेहेरा अध्यक्षपदी द्यावा या विचाराने भाई जगताप यांची निवड झाली. सुरवातीचे काही महिने भाईंनी तीव्र आंदोलने केली. पण पुढे ते थंडावले. भाई जगताप पक्षासाठी आर्थिक रसद मिळवण्यात देखील अपयशी ठरले. अंतर्गत विरोध आणि संघर्ष करूनही सत्ता येण्याचे कुठलेही लक्षण दिसत नसल्याने भाई देखील पक्षात नाखूश होते. त्यात २०१६च्या निवडणुकीत भाई एका मताने निवडून आले. तसचं २०२२ च्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांना उमेदवारी दिली होती. हंडोरे यांना क्रमांक एकची मते मिळणे अपेक्षित असतांना हंडोरे पडले आणि भाईंनी बाजी मारली.

या दोन्ही निवडणुकीत पडद्यामागे भाजपचे आशिष शेलार यांची मैत्री कामी आली का, यावर बऱ्याच चर्चा तेव्हा रंगल्या होत्या. हंडोर यांचा पराभव झाल्यानंतर काँग्रेसने एक समिती नेमली. या समितीचा अहवाल भाई जगताप यांच्या विरोधात गेला. अखेर भाई जगताप याना पद गमवावे लागले.

वर्षा गायकवाड यांची निवड
राहुल गांधी यांच्या कोअर टीमच्या सदस्य, विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अत्यंत विस्वासू असल्याने वर्षा गायकवाड यांची मुंबई प्रदेश अध्यक्षपदी वर्णी लागल्याचे बोलले जाते.

काँग्रेसचा मुंबईमध्ये असलेला पारंपरिक दलित, मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतांचे गणित पाहता वर्षा गायकवाड यांचा चेहेरा देण्यात आला. वडील माजी खासदार एकनाथ गायकवाड हे देखील मुंबई प्रदेश अध्यक्ष राहिले होते. गेल्या तीन वर्ष गायकवाड यांच्याकडे मंत्रिपद होते. त्या निवडणुकीत पक्षासाठी आर्थिक रसद आणू शकतील हा विश्वास पक्षाला आहे. काँग्रेसमधील सर्व गटाला दगडापेक्षा वीट मऊ, या धोरणातून वर्षा गायकवाड यांना पाठिंवा मिळेल अशी आशा आहे. भाजपने मुंबईत दलित मुस्लिम बहुल भागात अधिक लक्ष केंद्रित केलं. त्यात केंद्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे बहुतांश कार्यक्रम हे दलित मुस्लिम बहुल भागात झाले. हे देखील एक कारण विचारत घेतले गेल्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी वर्षा गायकवाड भाजपत जाणार का ? याबाबत चर्चा रंगली होती. गायकवाड याना अध्यक्ष पद दिल्यानंतर ही चर्चा थांबली.

वर्षा गायकवाड यांच्या समोरची आव्हाने
मुंबईत भाजपासारखं तगड आव्हान गायकवाड यांना पेलता येईल का? भाजपचे आक्रमक प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांचे नियोजन यासमोर त्या किती टिकतील? काँग्रेसमधले हँडोर, निरुपम, बाबा सिधिकी या गटाची मनधरणी त्या करू शकतील का? या सर्व गटांना एकत्र ठेऊन काम करण्याचे मोठं आव्हान गायकवाड यांच्यापुढे आहे. मुंबई महापालिका आणि आगामी लोकसभे सारख्या अत्यंत महत्चाच्या निवडणुकीपूर्वी वर्षा गायकवाड या अध्यक्ष होत आहेत. मुंबई महानगरपालिकेत कॉंग्रेसच्या नगरसेवकांची संख्या वाढवणं, हे देखील आव्हान त्यांच्या पुढं आहे. आर्थिक रसद, नियोजन , आणि जाहीर सभांमध्ये भाषण आणि पक्षाचा चेहरा अशा अनेक मुद्यावर खरे उतरणे हे एक मोठ आव्हान वर्षा गायकवाड कशा पेलतील? हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube