सुनील तटकरेंची झोप उडेल, असा खेळ भरत गोगावलेंनी मांडलाय!

  • Written By: Published:
सुनील तटकरेंची झोप उडेल, असा खेळ भरत गोगावलेंनी मांडलाय!

रायगडचे शिवसेनेचे नेते भरत गोगावले (Bharat Gogawale) हे सोशल मिडियावर ट्रेंडीग असतात. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडात सुरवातीपासून साथ देणाऱ्या गोगावले यांना अजूनपर्यंत मंत्रीपद मिळू शकले नाही. त्याची खंत त्यांना आहेच.  त्यांच्या या दुखऱ्या जखमेवर सोशल मिडियात त्यांचे विरोधक मीठ चोळतात. रायगडचे भावी पालकमंत्री म्हणून त्यांची खिल्ली उडविली जाते. तसेच त्यांचा मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी सूट शिवून तयार होता. पण त्यावर आता धूळ बसली आहे. अशी टिप्पणी त्यांच्यावर केली जाते.  भरतशेठ हेच भावी पालकमंत्री म्हणून प्रसिद्ध असताना त्यांच्या मुलाचेही रायगडचे भावी खासदार म्हणून फलक लागले आहेत. त्यामुळे रायगडमध्ये त्यावरून राजकीय वातावरण तापले आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे खासदार आहेत. ही जागा राष्ट्रवादीला मिळावी म्हणून स्वतः अजित पवार हे प्रयत्न करत आहेत. त्यांनी हा प्रतिष्ठेचा मुद्दा केला आहे. त्यात विकास गोगावले यांचे भावी खासदार म्हणून फलक लागल्याने तटकरे यांना पुन्हा डिवचण्याचे काम गोगावले यांच्या समर्थकांनी केले आहे.

गोगावले विरुद्ध तटकरे हा संघर्ष रायगडमध्ये नवीन नाही. शिवसेनेला रायगडमध्ये रोखण्याचे काम तटकरे यांनी केले. त्यामुळे सेनेच्या बहुतांश आमदारांचा त्यांच्यावर आधीपासून राग आहे. हा राग इतका विकोपाला गेला होता की त्यावरून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाला होता. ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात तेव्हा आदिती तटकरे या मंत्री होत्या. त्याच पालकमंत्री झाल्या. तटकरे हे शिवसेना आमदारांच्या विकासकामांत खोडा घालत असल्याची तक्रार ठाकरेंकडे करण्यात आली होती. त्यात खुद्द शरद पवार यांना मध्यस्थी करावी लागली. पवार आणि ठाकरे यांच्यात बैठक होऊन गोगावले आणि इतर आमदारांची नाराजी दूर झाली.

ठाकरे गटातील दुफळी चव्हाट्यावर… वाकचौरेंच्या उमेदवारीला विरोध

तटकरे यांच्याशी असलेला वाद याच कारणांमुळे गोगावले हे उद्धव ठाकरे यांच्य़ापासून दूर गेले. त्यांनी थेट शिंदे यांच्या बंडात महत्वाची भूमिका बजावली. ते शिंदे यांच्या गटाचे प्रतोद झाले. पण मंत्री होण्याचे स्वप्न त्यांचे पूर्ण झाले नाही. हे दुःख एका बाजूला असताना अजित पवार हे पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर आदिती तटकरे यांना बढती मिळून त्या कॅबिनेट मंत्री झाल्या. कोणत्याही स्थितीत तटकरे या रायगडच्या पुन्हा पालकमंत्री होऊ नयेत यासाठी गोगावले यांनी जंग जंग पछाडले. महायुतीतील पालकमंत्री पदाचे वाटप एकट्या गोगावले यांच्या आक्षेपामुळे थांबले होते. स्वातंत्र्यदिनी तटकरे यांनी ध्वजवंदन करण्यासही गोगावले यांनी विरोध केला होता. तेवढे गोगावले यांचे ऐकले गेले. अखेरीस पालकमंत्रीपद पुन्हा आदिती यांच्याकडेच गेले नाहीच. त्यांच्याऐवजी शिवसेनेच्या उदय सामंत यांच्याकडे ते पालकमंत्रीपद गेले.

तेव्हापासून गोगावले हे दुसऱ्यांदा सुनील तटकरे यांना दणका देण्याच्या  तयारीला लागले आहेत.  दुसरीकडे भाजपनेही तटकरे यांच्याविरोधात भूंमिका घेतली आहे.  कुठल्याही परिस्थितीत सुनील तटकरे रायगडचे उमेदवार नकोच, अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली. मतदारसंघात फारशी ताकद नसतांनाही रायगडची जागा भाजपला मिळावी असा हट्ट त्यांचा आहे.  शेकापमधून भाजपमध्ये आलेल्या आणि दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्षपद संभाळणाऱ्या माजी आमदार धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्याची  मागणी पक्षाच्या जिल्हा कार्यकारीणीने लावून धरली आहे. महायुतीच्या दोन पक्षांत रायगडच्या जागेवरून खल सुरू असतांनाच आता त्यात शिवसेना शिंदे गटाने उडी घेतली आहे.

मालदीवचा पर्यटन उद्योग संकटात! भारतीय पर्यटकांनी फिरवली पाठ, पर्यटन संख्येत ३३ टक्के घट

रायगड लोकसभा मतदारसंघातील राजकीय बलाबल लक्षात घेतले तर या मतदारसंघात शिवसेनेचे तीन, भाजपचा एक, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आणि शिवसेना ठाकरे गटाचा एक आमदार आहे. त्यामुळे इतर दोन्ही मित्र पक्षांच्या तुलनेत शिवसेनेची मतदारसंघातील ताकद जास्त आहे. त्यामुळे या भाजप, राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेने या मतदारसंघावर दावा सांगणे अधिक उचित असल्याची भुमिका युवासेनेने घेतली आहे. भरत गोगावले यांचे पूत्र आणि युवासेनेचे नेते विकास गोगावले यांना रायगड लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी युवासैनिकांनी  केली आहे. समाजमाध्यमांवर सध्या यांसदर्भात जोरदार बॅनरबाजी सुरू झाली आहे.

पण तटकरे हे काही कच्च्या गुरूचे चेले नाहीत. त्यांनाही गोगावले यांना कसे थोपवयाचे याचे गणित माहीत आहे. गोगावले यांची एकही इच्छा पूर्ण होणार नाही, यासाठी त्यांनी अनेक खेळ्या केल्या.  महायुतीतील जागावाटपात रायगडची जागा ते मिळवतील देखील. पण विजयी होण्यासाठी त्यांना शिवसेनेची मदत आवश्यक ठरणार आहे. शिवसेनेच्या आमदारांना नाराज करून येथे विजय मिळवणे, तटकरे यांच्यासाठी सोपे नसेल. येथे उद्धव ठाकरे यांच्याकडून अनंत गिते यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यांच्या नावाची घोषणा खुद्द शरद पवार यांनी पेण येथील कार्यक्रमात केली. गिते हे देखील तयारीला लागले आहेत. गेल्या निवडणुकीत तटकरे हे सुमारे फक्त पाच हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले होते. त्यामुळे यंदाही त्यांना कडवे आव्हान असणार आहे. त्यात गोगावले यांचे दबावतंत्र ते कसे दूर करणार, याची उत्सुकता असणार आहे. पण वडिलांप्रमाणे भावी शब्दावर जोर देऊन विकास गोगावले यांनी तटकरेंना विरोध करण्याचा वारसा जपल्याचे दिसून येत आहे. वडिलांप्रमाणे ते पण भावी राहणार की त्यांचे स्वप्न सत्यात येणार, हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज