आरक्षणावरून दोन समाजात वाद निर्माण करू नका अन् अकलेचे तारे तोडू नका; बावनकुळेंचा इशारा
Chandrasekhar Bawankule On Reservation : मराठा आरक्षण (Maratha Reservation) देण्याची भाजपची भूमिका असून महाराष्ट्रातील महायुती सरकार मराठा समाजाला योग्य प्रकारे आरक्षण देण्यासाठी पुढाकार घेईल असा विश्वास व्यक्त करतानाच ‘मराठा व ओबीसी आरक्षणावरून दोन समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका व अकलेचे तारे तोडू नका’ असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी दिला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे जालन्यात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला मिळता प्रतिसाद पाहून सरकारनं नमती भूमिका घेत कुणबी समाजातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. सरकारने तसा जीआरही काढला. त्यानंतर मराठ्यांना कुणबी आरक्षण देऊ नये, असं म्हणत कुणबी समाज आक्रमक झाला. याबाबत बोलतांना बावनुकळे म्हणाले की, एका घटकाचे आरक्षण दुसऱ्या घटकाला देणे योग्य नाही. ओबीसीचे आरक्षण कायम राखून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी भाजपची भूमिका आहे. मराठा आरक्षण दिल्यावर कोर्टात चकरा माराव्या लागणार नाही. फसवणूक झाल्याची भावना निर्माण होणार नाही, अशी भूमिका सरकारला घ्यावी लागेल. मराठा आरक्षणासाठी आर्थिक-सामजिक सर्वेक्षणाच्या आधारावर सरकार योग्य निर्णय घेईल, असेही ते म्हणाले.
‘पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा’; मराठा आंदोलनातील लाठीचार्ज प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल
पंकजा मुंडे यांच्या आरक्षणावरून कोणताही किंतु-परंतु करण्याची गरज नाही. त्यांनी यात्रेचा उद्देश व भूमिका आधीच जाहीर केली आहे. राज्यात तीन नेते असून तिन्ही नेत्यांत योग्य समन्वय आहे. त्यांचे स्वतंत्र कार्यक्रम असू शकतात. त्यावरून चर्चा करणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.
भाजपा सरकारची कामे पोहचविणार
मुंबईत भाजपा लोकप्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीची माहिती देताना बावनकुळे म्हणाले, भाजप सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी व योजनांपासून कुणीही वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पक्ष म्हणून केले आहे. कोणतेही रिपोर्ट कार्ड कुणाकडूनच मागविले नाही, त्याविषयी केवळ वावड्या उठविण्यात आल्या आहेत.