अजितदादांच्या बालेकिल्यात भाजपचा बॉस होणार; पिंपरीत महापौरपदासाठी कोणती नावे चर्चेत?
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौरपद खुला प्रवर्ग साठी राखीव; त्यामुळे महापौरपदासाठी कोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष.
BJP mayor to sit in Ajit Dada’s stronghold : एकेकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अभेद्य बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत यावेळी मोठा राजकीय सत्तापालट पाहायला मिळाला आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आपला झेंडा फडकावला आहे. या निकालामुळे केवळ स्थानिक राजकारणचं नव्हे, तर राज्याच्या राजकारणातही नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
ही निवडणूक फक्त महापालिकेच्या सत्तेसाठी नव्हती, तर ती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई मनाली जात होती. पिंपरी-चिंचवड हा परिसर अजित पवारांचा पारंपरिक प्रभावक्षेत्र म्हणून ओळखला जातो. प्रचारादरम्यान मेट्रोचे जाळे अधिक व्यापक करण्याचे, मोफत बससेवा सुरू करण्याचे आणि पायाभूत सुविधांवर भर देण्याचे मोठमोठे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, प्रत्यक्षात मतदानाच्या वेळी मतदारांनी या आश्वासनांपेक्षा भाजपच्या मागील कार्यकाळातील कामगिरीवर अधिक विश्वास टाकल्याचे चित्र स्पष्ट झाले.
दरम्यान, नव्याने जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीनुसार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौरपद खुला प्रवर्ग साठी राखीव करण्यात आले आहे. त्यामुळे महापौरपदासाठी कोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने पहिला महापौर कोण असेल, याचा निर्णय पक्षांतर्गत चर्चेतूनच होणार आहे.
ब्रेकिंग! ठाणे, जालना लातूरमध्ये एससी प्रवर्गाचा महापौर; कल्याण-डोंबिवली एसटी प्रवर्गासाठी राखीव…
विशेष बाब म्हणजे या निवडणुकीत भाजपच्या महिला उमेदवारांनी घवघवीत यश मिळवले आहे. तब्बल 7 महिला उमेदवारांनी 10 हजारांहून अधिक मताधिक्क्याने विजय मिळवत पक्षातील आपली ताकद अधोरेखित केली आहे. यामध्ये सारिका गायकवाड यांनी 16 हजार 11 मतांचे विक्रमी मताधिक्य मिळवत सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांच्यासोबतच स्नेहा कलाटे, रेश्मा भुजबळ आणि श्रुती डोळस ही नावे देखील महापौर पदाच्या शर्यतीत आघाडीवर मानाली जात आहेत.
भाजप नेतृत्व शहर विकासाचा स्पष्ट दृष्टिकोन, प्रशासकीय अनुभव, उच्च शिक्षण आणि संघटन कौशल्य या निकषांवर आपला महापौर निवडण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत पिंपरी चिंचवडला भाजपचा पहिला महापौर कोण मिळतो, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांचेही लक्ष लागले आहे.
