Political News : सांगलीत आता ‘ज्युनिअर’ पाटील आमने-सामने!

सांगली : सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुका आतापर्यंत राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील आबा आणि भाजपचे खासदार संजय पाटील यांच्या राजकीय संघर्षाचे केंद्रबिंदू म्हणून ओळखला जात होता. परंतु आता त्यांचे चिरंजीव रोहीत पाटील (Rohit Patil) आणि प्रभाकर पाटील (Prabhakar Patil) यांच्यातही संघर्षाला सुरुवात झाली असून या दोघांनी भर कार्यक्रमात एकमेकांना इशारे देण्यास सुरुवात केली आहे.
आपल्या मुलाला राजकारणात आणणार नाही, असे म्हणणारे खासदार संजय पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच आपला मुलगा प्रभाकरला राजकारणात लॉन्च केलं आहे. त्यामुळे दोन सिनिअर पाटलांमधील संघर्ष आता ज्युनिअर पाटलांपर्यंत येऊन पोहोचला आहे.
भावी आमदार म्हणून दोघांकडे पहिले जात असल्याने जुन्या संघर्षाला आता नवी पिढी पुढं घेऊन जात आहे. यामुळेच दोघांकडून देखील आता जाहीर सभांमध्ये एकमेकांना आव्हानाची भाषा केली जात आहे. दरम्यान लवकरच आर.आर पाटील यांचे सुपूत्र रोहित पाटील खासदार संजय काका पाटील यांचे पूत्र प्रभाकर पाटील यांच्यामध्ये हा संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी नागझ इथल्या कार्यक्रमामध्ये प्रभाकर पाटील यांनी जोरदार भाषण केलं. गुंडगिरी करणाऱ्या विरोधकांना घरातून बाहेर पडून देणार नाही, असा इशारा प्रभाकर पाटील यांनी दिला होता. त्यांच्या या आव्हानाला प्रत्युत्तर देताना रोहित पाटील म्हणाले, कुणी घराबाहेर पडू देणार नाही, असं म्हणत असेल तर आम्हीदेखील बांगड्या भरलेल्या नाहीयेत, असं रोहित पाटील यांनी म्हणलं आहे.
भावी आमदार
रोहित पाटील हे राष्ट्रवादीकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठीचे निश्चित उमेदवार मानले जात आहे. कार्यकर्त्यांकडून रोहित पाटील यांचा भावी आमदार असा उल्लेख देखील होऊ लागला आहे. तर दुसरीकडे, अलीकडील काळात खासदार समर्थकांकडून प्रभाकर पाटील यांचा देखील उल्लेख भावी आमदार असाच केला जात आहे.