काँग्रेसने महिला आरक्षण विधेयक १२ वेळा संसदेतून परत पाठवले; बावनकुळेंची टीका
Chandrasekhar Bawankule on Congress : केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ला (Women’s reservation bill) आज लोकसभेत मंजुरी मिळाली. या विधेयकाच्या बाजूने 454 तर विरोधात 2 मते पडली. आता हे विधेयक उद्या राज्यसभेत मांडले जाणार आहे. तेथे मंजुरी मिळाल्यानंतर ते राष्ट्रपतींकडे पाठवले जाईल. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल. दरम्यान याच विधेयकावरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी कॉंग्रेसवर घणाघाती टीका केली.
आज लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू असतांना काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी आपली भूमिका मांडली आहे. महिला आरक्षण विधेयक हे माझे पती राजीव गांधी यांचे स्वप्न होते, ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे, असे त्या म्हणाल्या. त्यानंतर माध्यमांशी नागपूर येथे बोलतांना बावनकुळे म्हणाले की, महिलांनी राजकारणात पुढे आले पाहिजे, अशी भूमिका भाजपने नेहमीच घेतली आहे. यामुळेच भाजपमध्ये 15 लाखांहून अधिक महिला पदाधिकारी आहेत. काँग्रेसने महिला आरक्षण विधेयक १२ वेळा संसदेतून परत पाठवले, अशी टीका केली.
ते म्हणाले, काँग्रेस आणि उबाठा गटाकडे महिला नेतृत्व नाही. काँग्रेसने घराणेशाही आहे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस ही सरदारांची फौज आहे. शरद पवारांनी कुटुंबाशिवाय बाहेरच्यांना मोठे होऊ दिले नाही. भाजपमध्ये सामान्य कार्यकर्त्यांचाही विकास होतो, असं बावनकुळे म्हणाले.
आदित्य ठाकरे हे मध्यप्रदेशमध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण कऱण्यात आहेत. याविषयी विचारले असता बावनकुळे म्हणाले की, मध्य प्रदेश काँग्रेसचे नेते कमलनाथ यांचा मराठी मतदारांवर डोळा असून पांढुर्णा येथे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पुतळा बसवून त्याचे अनावरण आदित्य ठाकरेंच्या हस्ते करून ते केविलवाणा प्रयत्न करत आहेत. त्यापूर्वी त्यांनी त्यांच्याच लोकसभा मतदारसंघ असलेल्या सौंसर येथील शिवाजी महाराजांचा पुतळा का पाडला याचे उत्तर द्यावे, असा प्रश्न केला.
यावेळी बोलतांना बावनकुळेंनी तत्कालीन ठाकरे सरकारच्या कारभारावरही ताशेरे ओढले. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यकाळात विरोधी पक्षांचे आमदार आणि लोकप्रतिनिधींना जिल्हा नियोजन समितीचा निधी देऊ नये, असा अलिखित आदेश काढण्यात आला होता. त्यांनी आकसापोटी राजकारण केले. आता ते लोक निधी वाटपाबाबत बोलत आहेत. त्यांनी स्वत:कडे पहावे. फडणवीस हे नागपूरचे पालकमंत्री आहेत, त्यांनी डीपीसीतून एक हजार कोटींचा निधी दिला आहे. या विकास निधीचा योग्य विनियोग करून विविध योजना राबविल्या जाव्यात, अशी आमची भूमिका आहे.