एकनाथ शिंदे अन् अजितदादांना पाच मतदारसंघात अवघड पेपर… विजयासाठी घाम गाळावा लागणार!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना यंदाची लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) त्यांच्या आजपर्यंतच्या राजकीय कारकीर्दीमधील सर्वात अवघड ठरु शकते. एक तर दोघांनीही पक्षांमध्ये केलेले बंड, त्यानंतर पक्षनेतृत्वावर केलेले गंभीर आरोप आणि भाजपसोबत स्थापन केलेली सत्ता या दोन वर्षांमधील घटनांमुळे दोघांसाठी देखील ही निवडणूक नैतिकता सिद्ध करण्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची असणार आहे. आपण चुकीचे नव्हतो हे जनतेच्या न्यायालयात सिद्ध करण्यासाठी ही सगळ्यात मोठी कसोटी असणार आहे. मात्र या कसोटीमध्ये या दोघांचाही पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये अक्षरशः घाम निघणार आहे… पाहुयात हे पाच मतदारसंघ कोणते… (Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar are likely to face the toughest Lok Sabha elections this year)
सगळ्यात पहिला मतदारसंघ म्हणजे बारामती :
अजितदादांसाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. कारण जरी ही लढाई वर वर सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी होणार असली तरी प्रत्यक्षात ती अजित पवार आणि भाजप विरुद्ध शरद पवार अशी होणार आहे. भाजपने या मतदारसंघात विजय मिळविण्याचा जणू चंगच बांधला आहे. तर अजितदादांनी सुनेत्रा पवारांना इथून उमेदवारी देऊन आपल्या आयुष्यातील एक मोठा राजकीय डाव खेळला आहे.
बिहारमध्ये ‘एनडीए’चं जागा वाटप ठरलं! घटक पक्ष वरचढ, महाराष्ट्रात काय होणार?
यापूर्वी पार्थ पवार यांना मावळमध्ये विजय मिळविता आला नव्हता. त्यावरुन अजित पवार यांना आजही विरोधी पक्षांकडून टोमणे ऐकून घ्यावे लागतात. अशात सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला तर अजित पवार यांना आणखी एक पराभवाचा ठपका कपाळी घेऊन राजकारण करावे लागू शकते. त्याशिवाय बारामती मतदारसंघात आजही शरद पवार यांनाच मानले जाते असा मेसेज जाऊ शकतो. पण बारामती जिंकल्यास अजित पवार बारामतीचे दादा आहेत, यावर शिक्कामोर्तब होईलच पण त्यासोबतच त्यांच्या बंडाला एक नैतिकताही मिळू शकेल. त्यामुळे अजित पवार यांनी बारामती जिंकण्यासाठी दिवसरात्र एक करण्याची तयारी दाखविली आहे.
अजितदादांसाठी आव्हान ठरणारा दुसरा मतदारसंघ आहे तो शिरुर :
शिरुरमध्ये अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाकडून उमेदवार असणार आहेत. पण शिरुर जिंकण्यासाठी अजितदादांनी मोठी फिल्डिंग लावली आहे. माध्यमांमधून शिरुरमध्ये आपलाच खासदार निवडून येणार, कोल्हे पुन्हा कसे निवडून येतात हेच बघतो असे म्हणत त्यांना जाहीरपणे आव्हान देत हा मतदारसंघ अस्तित्वाचा केला आहे. अजित पवार यांची मतदारसंघात मोठ्या प्रमाणात ताकदही आहे. खेडचे आमदार दिलीप मोहिते, आंबेगावचे आमदार आणि राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील,जुन्नरचे आमदार अतुल बेनके हे अजित पवार गटात आहेत.
मात्र कोल्हे यांना पराभूत करणे अजितदादांसाठी फारसे सोपे असणार नाही. त्याचे पहिले कारण शरद पवार आणि अमोल कोल्हे यांचा या मतदारसंघातील प्रभाव. शरद पवार यांनी थेट दिलीप वळसे पाटील यांना लक्ष करुन या मतदारसंघातील मोठ्या मतदाराला पुन्हा आपलेसे केले आहे. त्याचवेळी कोल्हे यांनीही पाच वर्षांमध्ये मतदारसंघामध्ये त्यांना मानणारा असा स्वतःचा मोठा वर्ग तयार केला आहे. अशोक पवार हे शिरुरचे आमदारही शरद पवार यांच्या बाजूने आहेत.
जर अजितदादांनी शिरुरमध्ये आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली तर खेडचे आमदार दिलीप मोहिते अजितदादांची साथ सोडू शकतात. दुसरे कारण म्हणजे शिरुरमधील कांदा प्रश्न. शिरुर लोकसभा मतदारसंघातील आंबेगाव, जुन्नर या मतदारसंघांमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होते. मात्र केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीमुळे इथला शेतकरी नाराज असल्याचे दिसून येत आहे. या नाराजीला अमोल कोल्हे यांनी मागील काही दिवसांमध्ये चांगले हेरण्याचे आणि त्याला वाचा फोडण्याचे काम कोल्हे यांनी केले आहे. या कांदा प्रश्नावर अजितदादांनाही फारसे समाधानकारक प्रयत्न आजवरत करता आलेले नाहीत.
उस्मानाबाद :
उस्मानाबाद मतदारसंघासाठी एकनाथ शिंदे आणि अजितदादा दोघेही आग्रही आहेत. मात्र दोघांपैकी हा मतदारसंघ कोणाकडे आणि उमेदवार कोण असणार याचा निर्णय अद्याप बाकी आहे. पण कोणाकडेही गेला तरी या मतदारसंघात विजय मिळविताना त्यांचा घाम निघणार हे निश्चित. कारण महाविकास आघाडीत सध्या हा मतदारसंघ उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या ताब्यात आहे. मागील पाच वर्षांच्या काळात राजेनिंबाळकरांनी मतदारसंघातील संपर्क आणि वावर यामुळे स्वतःचा एक वेगळा प्रभाव निर्माण केला आहे.
चार महिन्यांचा मुलगा थेट कोट्यधीश! Narayan Murthy यांच्याकडून नातवाला 240 कोटींचे शेअर्स गिफ्ट
याशिवाय ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिल्याने त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाऊ लागले आहे. यापूर्वीपर्यंत धाराशिव मतदारसंघ राज्यात तसा फारसा चर्चेत नसायचा. पण 2019 पासून त्यांच्यामुळे या मतदारसंघाची चर्चा राज्यात होऊ लागली आहे. पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ आता ठाकरेंनी आतापर्यंत चांगल्यारितीने बांधून ठेवला आहे. याचमुळे ठाकरे आणि राजेनिंबाळकर यांचा हा प्रभाव प्रभाव मोडून काढण्यात त्याच ताकदीचा आणि तेवढ्या प्रभावाचा उमेदवार द्यावा लागणार आहे.
कोल्हापूर :
कोल्हापूर मतदारसंघासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत. मात्र त्यांचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना पुन्हा निवडून यायचे असल्यास गतवेळीपेक्षा जास्त कष्ट करावे लागू शकतात. याचे कारण काँग्रेसने दिलेला उमेदवार. काँग्रेसने इथून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली आहे. सजेत पाटील यांच्यासारखा बडा नेता, काँग्रेसचे मतदारसंघातील आमदार, जिल्हा परिषद, महापालिकेमधील ताकद, गोकुळ सारखी संस्था, शाहू महाराज यांना कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातच मानणारा असलेला मोठा वर्ग आणि राजघराण्याचे वलय यामुळेही त्यांच्या उमेदवारीला महत्व प्राप्त होते. अशा परिस्थितीमध्ये बंडानंतर कोल्हापूरची जागा पुन्हा राखणे हे शिंदेंपुढील मोठे आव्हान ठरणारे असू शकते.
परभणी :
परभणी लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार संजय जाधव आणि आमदार राहुल पाटील हे ठाकरेंसोबत कायम आहेत. संजय जाधव यांना पुन्हा उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. तर युतीमध्ये हा मतदारसंघ अजितदादांकडे जाण्याची शक्यता आहे. अजितदादांच्या गटाकडून राजेश विटेकर यांच्या नावाची चर्चा आहे. विटेकर यांच्यासारखा तगडा उमेदवार आणि राष्ट्रवादीची मतदारसंघातील ताकद यामुळे विटेकर यांचे समीकरण सोपे असले तरीही या मतदारसंघात आजवर एकदाही राष्ट्रवादीला विजय मिळविता आलेला नाही. 1998 साली काँग्रेसचे सुरेश वरपूडकर यांचा अपवाद वगळता मागचे तब्बल सात टर्म या मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार निवडून गेला आहे. शिवसेनेची ही असलेली ताकद, ठाकरेंच्या बाजूने असलेली सहानुभूतीची लाट आणि संजय जाधव यांच्यासारखा एकनिष्ठ शिवसैनिक यामुळेच अजितदादांना इथे विजयासाठी घाम गाळावा लागणार आहे.