Eknath Shinde : CM शिंदे चिडले, ‘त्या’ आरोपांवर पटोलेंना थेट चॅलेंज !
Eknath Shinde : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेतले. यानंतर आता या आंदोलनावर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या इशाऱ्यावरूनच हे आंदोलन झाले असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला होता. पटोलेंच्या या आरोपांवर आता स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे म्हणाले, नाना पटोले यांना सध्या कुणीच गांभीर्याने घेत नाही. म्हणून त्यांची तडफड होत आहे. काहीतरी आरोप केला की त्याची दखल घेतली जाईल असे त्यांना वाटत असावे. पटोले माझे मित्र आहेत. त्यांनी छातीवर हात ठेऊन सांगावं की यामध्ये एकनाथ शिंदेंचा हात आहे का?, असे आव्हान देणारा सवाल त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनीच जरांगे पाटलांना उपोषणाला बसवलं; कॉंग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा
पटोले काय म्हणाले होते ?
मनोज जरांगेंनी जालन्याच्या अंतरवली गावात सतरा दिवस उपोषण केले. मात्र जरांगे यांना मुख्यमंत्र्यांनीच उपोषणाला बसवलं होतं. जालन्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते. 31 तारखेच्या मध्यरात्री आंदोलक संतप्त झाले. मात्र 1 तारखेला दुपारी 3 वाजता सौम्य लाठीचार्ज करण्याचे आदेश देण्यात आले. याच दिवशी मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरू होती. केवळ सभेवरून लक्ष वळवण्यासाठी लाठीचार्जची घटना घडल्याचा आरोप पटोले यांनी केला. मुख्यमंत्र्यांनीच जरांग पाटलांना उपोषणाला बसवले होते, हे आता सिद्ध झाले आहे. कारण सौम्य लाठीचार्ज झाला आणि फडणवीस यांनी माफीही मागितली. दोन समाजात भांडणं लावण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
सतरा दिवसांनंतर उपोषण मागे
दरम्यान, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. जीआरमधील वंशावळीचा उल्लेख काढून टाकावा. ज्या अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज केला. त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे. सक्तीच्या रजेवर पाठवणे हा उपाय नाही. ज्या मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांच्यावरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली होती. या मागण्यांवर ते ठाम होते. त्यामुळेच त्यांचे उपोषण दीर्घकाळ चालले होते.