एकनाथ शिदेंचा नक्षलवाद्यांच्या हातून एन्काऊंटर केलं जाणार होतं; संजय गायकवाड यांचा गंभीर आरोप
Sanjay Gaikwad : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना नक्षलवाद्यांच्या हातून जीवे मारलं जाणार होतं, असं खळबळजनक विधान गायकवाड यांनी केलं. तसंच मी जबाबदारपणे हा गौप्यस्फोट करत आहे, असंही ते म्हणाले. गायकवाड यांच्या विधानानंतर राजकीय वर्तृळात एकच खळबळ उडाली आहे. शिवाय, एकनाथ शिंदेंचं एन्काऊंटर (Encounter) घडवण्यात कुणाचा सहभाग होता? याबद्दल सूचक वक्तव्यही गायकवाड यांनी केलं आहे.
IB Bharti 2023: देशाच्या गुप्तचर विभागात बंपर भरती, दहावी उत्तीर्ण करू शकतात अर्ज, पगार 69 हजार
संजय गायकवाड यांनी आज माध्यमांशी संवाद साधतांना हा आरोप केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हत्येच्या कटाचा पर्दाफाश करताना गायकवाड म्हणाले, एकनाथ शिंदे यांना दुसरे काही दिलं जाणार नव्हतं, तर त्यांना मृत्यू दिला जाणार होता. मृत्यू. नक्षलवाद्यांच्या हातून त्यांचं एन्काऊंटर केलं जाणार होतं. मुख्यमंत्र्यांना नक्षलींच्या ताब्यात देऊन हत्या घडवून आणण्याचं त्यांचं स्वप्न धुळीस मिळालं आहे. मी अत्यंत जबाबदारीने हा खुलासा करत आहे, असं गायकवाड यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदेंच्या कथित एन्काऊंटरमागे नेमकी पार्श्वभूमी काय? असा प्रश्न विचारला असता संजय गायकवाड पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना नक्षलवाद्यांकडून धमक्या आल्या होत्या. या धमकीनंतर राज्य सरकारने एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. ही सुरक्षा देण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरी बैठक सुरू होती. त्यावेळी मातोश्रीवरून फोन आला आणि एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देऊ नका, असे सांगण्यात आले. याचा अर्थ काय? तुम्ही त्यांना मारण्यासाठी टपले होते. शिंदे राजकारणातून खतम होत नाहीत, म्हणून त्यांना नक्षलींच्या हातून मारायचं होतं. त्यामुळं त्यांनी एकनाथ शिंदेंना सुरक्षा नाकारली.
यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. संजय राऊत ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. राऊत यांना सांगायचं की, त्यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्यापेक्षा आधी ललित पाटील याच्यासोबत असलेलाा उद्धव ठाकरेंचा फोटो पाहावा. ललित पाटीलशी उद्धव ठाकरेंचा संबंध कसा? असा आरोप आम्ही करायचा का? याचं उत्तर आधी द्या. खोटे आरोप करायचे, सरकारला बदनाम करायचं हा यांचा रोजचा कार्यक्रम आहे. यातून हाती काही लागणार नाही, उलट तुमच्या अडचणी वाढतील, असा इशारा त्यांनी दिला.
संजय गायकवाड यांचा सर्व रोख उद्धव ठाकरेंकडे आहे. त्यामुळं आता ठाकरे गटाकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.