‘आमचं सोडा, जनताच धडा शिकवेल’; ठाकरेंच्या शिलेदाराची पार्टी फडणवीसांच्या रडारवर

‘आमचं सोडा, जनताच धडा शिकवेल’; ठाकरेंच्या शिलेदाराची पार्टी फडणवीसांच्या रडारवर

Devendra Fadnavis : उबाठा सेनेचा नाशिकचा जिल्हाप्रमुख हा दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता. आता नावच कुत्ता आहे. या कुत्तासोबत स्वतःच्या फार्महाऊसवर कुत्त्यासाठी पार्टी ठेवतो. आणि काय डान्स त्या कुत्त्यासोबत त्याचा. म्हणजे जसं काही सेलिब्रेशन चाललंय. एखादा स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जेलमधून सुटून आलाय अशा प्रकारचं सेलिब्रेशन त्या ठिकाणी चाललं आहे. अरे शरम वाटली पाहिजे, अशा कठोर शब्दांत हल्लाबोल करत आम्ही तुम्हाला काही शिकवायचं सोडाच जनताच तुम्हाला धडा शिकवणार आहे, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे गटाला दिला. भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे गट, काँग्रेस तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. (Deputy Chief Minister Devendra Fadnavis criticized Uddhav Thackeray Faction)

काल भाजप आमदार नितेश राणे विधिमंडळ अधिवेशनात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा सहकारी सलीम कुत्ता आणि ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या पार्टीचा फोटो झळकावत गंभीर आरोप केले होते. हाच मुद्दा पकडत आज फडणवीस यांनी ठाकरे गटावर खरमरीत टीका केली.  फडणवीस पुढे म्हणाले, या दाऊदने देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिलं होतं. त्याच दाऊदच्या साथीदारासोबत तुम्ही त्या ठिकाणी डान्स करता. ही त्यांची अवस्था आहे. आता ही लोकं आपल्याला राष्ट्रवाद शिकवणार. हे आपल्याला हिंदुत्व शिकवणार, असा सवाल फडणवीस यांनी केला.

दाऊदच्या हस्तकासोबत ठाकरेंचा शिलेदार; राणेंचे आरोप अन् फडणवीसांनी घोषित केली SIT

ते आपले विरोधक असतील तरी पण मला दुःख आहे कारण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे आपल्यासाठी नेहमीच वंदनीय राहिले आहेत. त्यांच्यासोबत इतकी वर्ष काम करताना जो विचार त्यांनी मांडला तो विचार सोडून त्या विचारांच्या विरोधकांसोबत रोज मांडीला मांडी लावून बसायचं आणि भाषणात हिंदुत्वादी म्हणवून घ्यायचं तुम्ही आम्हाला शिकवू नका म्हणायचं. अरे आम्ही शिकवायचं सोडाच जनताच आता तुम्हाला जनता धडा शिकवणार आहे, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

फडणवीसांकडून एसआयटीची घोषणा

बॉम्बस्फोटात जे आरोपी आहेत. विशेषतः या स्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम याच्या जवळचा जो कुत्ता आहे याच्यासोबत त्या ठिकाणी पार्टी करणं. खरं म्हणजे हा पेरोलवर बाहेर होता. पॅरोलवर बाहेर असताना पार्टी देखील करता येत नाही. त्यानं पार्टी करायची आणि कुणीतरी त्या पार्टीत जाऊन नाचायचं हे अतिशय गंभीर आहे. या संबंधित व्यक्तीचा काय संबंध आहे हे देखील तपासण्यात येईल. अशा प्रकारच्या पार्टीत कोण कोण होते. त्याला कुणाचा वरदहस्त होता का, हे देखील तपासण्यात येईल. बॉम्बस्फोटातल्या आरोपीसोबत जर कुणी पार्टी करत असेल तर याचा अर्थ संवेदना मेल्या आहेत. त्यामुळे एसआयटीच्या माध्यमातून आणि टाइम बाउंड पद्धतीनं या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी काल सभागृहात केली होती.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज