नवाब मलिक यांच्या नथीतून फडणवीसांचे अजितदादांवर पाच बाण!

  • Written By: Published:
नवाब मलिक यांच्या नथीतून फडणवीसांचे अजितदादांवर पाच बाण!

(Devendra Fadnavis on Mawab Malik) : राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढणार, याविषयी शंका नव्हतीच. त्याचा प्रत्यय महाराष्ट्रात भाजपने आपल्या मित्रपक्षाला म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसला लगेचच दिला. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तीन पक्षांच्या महायुतीत देवेंद्र फडणवीस हेच बाॅस असल्याचेही सिद्ध झाले. त्याला निमित्त ठरले नवाब मलिक (Nawab Malik) यांची विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनानिमित्त विधानसभेत झालेली एंट्री आणि त्यांनी सत्ताधारी बाकांवर बसण्याची साधलेली संधी. मलिक यांनी आपण राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात सहभागी होणार, याची माहिती जाहीरपणे दिली नव्हती. पण त्यांनी थेट सत्ताधारी बसून आपण अजित पवार यांच्यासोबत असल्याचे दाखवून कृतीतून त्याचे उत्तर दिले.

भाजपने आणि विशेषतः खुद्द फडणवीस यांनीच वारंवार आरोप केलेले मलिक हे महायुतीत म्हणजे सत्ताधारी बनल्याचे पाहून त्यावरून गहजब झाला. भाजपला सोशल मिडियातून टार्गेट करण्यात आले. ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच भाजपचे पुन्हा सत्ताधारी केले, अशी टीका झाली. त्यातून फडणीस यांनी मग तातडीने पावले टाकली. मलिक यांच्या निमित्ताने त्यांनी मित्रपक्षांनाही इशारा दिला. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा आत्मविश्वास दुणावल्याचे हे प्रतिक होते. मित्रपक्षांची जेवढी गरज भाजपला या आधी वाटत होती, ती आता नसल्याचेही यातून दिसले.  अजितदादांना मलिक यांना सोबत न घेण्याचा सल्ला फडणवीस यांनी पत्र लिहून दिला आणि हे पत्र स्वतःच सोशल मिडियातून प्रसिद्ध केले.

‘मलिक कोणत्या गटात माहित नाही, पत्राचं काय करायचं ते मी करीन’; फडणवीसांच्या पत्रावर अजितदादांचा भडका

भाजपच्या या कृतीने नक्की कोणती उद्दीष्टे साध्य झाली हे आपण पाहूया.

१)भाजप हाच मोठा भाऊ : एकनाथ शिंदे असोत की अजित पवार यांना त्यांच्या पक्षात कोणाला घ्यायचे याचे अधिकार नाहीत, हे फडणवीस यांनी दाखवून दिले. भाजपची जी धोरणे असतील त्याचीच री या नेत्यांना आणि त्यांच्या पक्षांना ओढावी लागणार आहे. अजित पवार यांच्यासारखा आक्रमक नेताही फडणवीस यांच्या या कृतीवर थेटपणे बोलला नाही. माझे मलिकांशी बोलणे झाले नाही, अशी सारवासारव अजितदादांना करावी लागली. मला फडणविसांना जे पत्र दिले आहे त्यावर मी माझे बघेन, अशी भूमिका घेत माध्यमांवरच आगपाखड केली.  एवढेच नाहीतर मलिक यांनी आमच्या गटाला लेखी पाठिंबा दिलेला नाही, अशी कबुलीही द्यावी लागली.

२)मित्रपक्षांची गरज नाही, याची जाणीव करून दिली–  महाराष्ट्रात ४० हून लोकसभेच्या अधिक जागा जिंकण्यासाठी भाजपला मतांची टक्केवारी वाढविण्याची गरज होती. त्यासाठी आधी शिवसेनेला फोडले आणि नंतर अजितदादांना सोबत घेतले. हिंदी पट्ट्यातील तीन राज्यांतील एकतर्फी विजयानंतर भाजपला आता मित्रपक्षांची गरज राहिलेली नाही. शिंदे असोत की अजित पवार हे आपण लोकसभेच्या किती जागा लढविणार हे जाहीर सभांमधून सांगत होते. आता भाजपचा जागावाटपावर वरचष्मा राहणार आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना भाजपकडून अधिक जागा मिळविण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत. याचीही चुणूक मलिक प्रकरणातून दिसून आली. फडणवीस यांनी या निमित्ताने अजित पवार यांची जाहीर कोंडी करण्यास मागेपुढे पाहिलेले नाही.

‘तो’ शिष्टाचारही भाजपनेही पाळावा; मलिकांवरील फडणवीसांच्या पत्राला अजितदादा गटाचे प्रत्युत्तर

३)देश प्रथमचा नारा देत पाठिराख्यांना चुचकराले- फडणवीस यांनी सत्तेसाठी आपण कोणाशीही तडजोड करणार नसल्याचा उल्लेख अजितदादांना लिहलेल्या पत्रात केला. यासाठी देश प्रथम, नंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः, हे सूत्रही फडणवीस यांनी लिहून टाकले. राष्ट्रवादीशी युती केल्यानंतर भाजपचा खंदा समर्थक मनातून खट्टू झाला होता. पण मलिकांनाच सोबत घेतले असते तर तो नाराजही झाला असता. ही नाराजी तातडीने दूर करण्याकरता फडणवीस यांनी पावले टाकली आणि अजितदादांना पत्र लिहून मन मोकळे झाले. मोहित कंबोज, आशिष शेलार यांना संभाव्य भयानक ट्रोलिंगपासून फडणवीस यांनी वाचविले, असेच म्हणावे लागेल.

 

)ध्रुवीकरणाचा सुप्त हेतू साध्य – भाजप हे नेहमची हिंदू-मुस्लिम असे ध्रुवीकरणाचे कार्ड खेळत असल्याचा आरोप होतो.  इक्बाल मिर्ची याच्याशी कथित संबंधावरून राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनाही लक्ष्य करण्यात आले होते. पण त्यांची साथ भाजपला खटकली नाही. उलट अजितदादांकडून पटेल हेच भाजपशी चर्चा करत होते, हे उघड झाले आहे. अजितदादांसोबत आरोप असलेले अनेक नेते आज भाजपच्या पाठिंब्यावर सत्तेत आहेत पण हा न्याय मलिक यांना लागू होणार नाही, असेही भाजपने दाखवून दिले आहे. त्यामुळे हिंदू कोर व्होट बॅंकेला न दुखावण्याचे धोरण यातून साध्य झाले.

 

५)अजितदादांना बॅकफूटवर ढकलले : उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार फाॅर्मात होते. त्यात अर्थखाते असो की पालकमंत्रीपदे, आपली मागणी पूर्ण करण्यासाठी अजितदादा आग्रहाने मांडणी करायचे आणि ती पूर्ण करूनच घ्यायचे. मलिक प्रकरणाचा त्यांनाही धडा मिळाला असेल. भाजपशी चर्चा करताना यापुढे किती तडजोड करावी लागेल, याची चुणूक त्यांना यातून दिसली. अर्थखाते असल्याने अजितदादांचा वरचष्मा होता. त्यातून भाजपच्या आमदारांची साहजिकच कुजबूज मोहीम सुरू असायची. आता फडणवीस हेच या सरकारचे बाॅस असल्याचा संदेश गेल्याने भाजप आमदारांना आतून उकळ्या फुटल्या असतील.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube