‘गंगा भागीरथी’वरुन भाजपमध्ये मतभेद, चित्रा वाघ यांनी सुचविला दुसरा शब्द
chitra wagh on widowed woman : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात विधवा महिलांच्या नावापुढे गंगा भागीरथी (Ganga Bhagirathi) असा उल्लेख करण्यावरुन राजकारण तापले आहे. महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांना विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी यापुढे त्यांच्या नावापुढे गंगा भागिरथी असा उल्लेख करावा, असा प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना विभागाच्या सचिवांना दिल्या होत्या. या निर्णयावर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून मोठी टीका झाली होती. आता या वादात भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उडी घेतली आहे. कोणत्याही सज्ञान स्त्रीला कुमारी, सौभाग्यवती, श्रीमती … असे वेगवेगळे उल्लेख करण्यापेक्षा नुसतं “श्रीमती” म्हणायला काय हरकत आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट केले आहे की गं.भा. म्हणजे गंगा भागीरथी… नवरा गेल्यानंतर गंगेवर जाऊन केशवपन केलेल्या स्त्रीला गं.भा. म्हणायची, लिहायची पद्धत होती. याऐवजी… कोणत्याही सज्ञान स्त्रीला कुमारी, सौभाग्यवती, श्रीमती… असे वेगवेगळे उल्लेख करण्यापेक्षा नुसतं “श्रीमती” म्हणायला काय हरकत आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
सुप्रिया सुळेंची आक्रमक भूमिका
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करुन सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. पती गमाविलेल्या महिलांना त्यांचा आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी राज्यातील अनेक गावांमध्ये प्रयत्न सुरू असताना, सरकार ‘गंगा भागिरथी’ हा जो काही वेगळा विचार करीत आहे, तो घाईघाईने घेतलेला निर्णय वाटतो त्यामुळे तो तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
वरळी की ठाण्यातून आमदार होणार ? आदित्य ठाकरे म्हणतात…
मंगलप्रभात लोढांची सारवासारव
मंगलप्रभात लोढा यांची सही असलेले एक पत्र गेल्या दोन दिवसांपासून सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. यानंतर लोढा यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. यानंतर आज मंगलप्रभात लोढा यांनी या वादावर सावरासावर करण्याचा प्रयत्न केला आहे. काही संघटनांनी विधवा महिलांसाठी चार ते पाच नावे सुचविले होते. त्यापैकीचं हे पत्र होते. संबंधित विभागाला फक्त तुमचे मत काय आहे? अशी चर्चा करण्यासाठी पाठवले होते. गंगा भागिरथी असा उल्लेख करण्याचा कोणताही निर्णय घेतला नाही आणि होणार पण नाही, असे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले.