आमचं ‘पाकीट’ दे रे भौ.., निवडणुकीच्या पैशांच्या वादाचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल…

आमचं ‘पाकीट’ दे रे भौ.., निवडणुकीच्या पैशांच्या वादाचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल…

जळगाव : नुकतीच जळगाव जिल्हा दुध संघाची निवडणुक पार पडली. या निवडणुकीत एकनाथ खडसे विरुद्ध मंत्री गिरीश महाजन , पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांचे पॅनल होते. चुरशीच्या लढतीत गिरीश महाजन यांच्या पॅनलचा मोठा विजय झाला. दरम्यान, निवडणुकीत पैशांची उधळपट्टी होत असल्याच्या चर्चांना उधाण असतानाच भालोद गावातील निवडणुकीच्या पैशांच्या वाटणीवरुन वाद सुरु असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

भालोद गावातील भांडणाचा हा व्हिडिओ स्थानिक अहिराणी आणि मराठी मिश्र भाषेत असल्याने कमालीचा लोकप्रिय देखील होतोय. जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीत मिळालेल्या पैशाचा वाटणी वरून गावा गावात चांगलीच भांडण लागली आहेत. त्याच हे प्रातिनिधिक उदाहरण आहे.

गेल्या आठवड्यात जळगाव जिल्हा सहकारी दूध संघ निवडणूक झाली. या निवडणुकीत एकनाथ खडसे विरुद्ध मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांचे पॅनल होते. यात गिरीश महाजन यांच्या पॅनलचा मोठा विजय झाला. दोन दिग्गज नेत्याच्या लढाईत, पैशाची उधळपट्टी झाली याची दबक्या आवाजात चर्चा होती. एका मताची किंमत पाच लाख रुपये असल्याचं देखील बोललं गेलं.

जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत १५ वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने जवापस १०० कोटी खर्च झाल्याची चर्चा होती. त्यानंतर दूध संघाचं इलेक्शन पैशांमुळे चांगलचं गाजलं. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत गावाचा दूध संघाचा सर्वसंमतीने एक प्रतिनिधी मतदान करतो. या व्हिडिओत ज्या प्रतिनिधीला गावातल्या दूध संघाने मतदानाचा अधिकार दिला, त्या मतदाराने पाच लाख रुपये घेतल्याचा आरोप, त्याच गावातील दूध संघ इतर सभासद करीत आहेत.

ठरल्याप्रमाणे मतदान बदल्यात जे पैसे आलेत, ते आपापसांत वाटून घ्यावे, असं ठरलेलं असताना, तुम्ही ५ लाख रुपये एकट्याने ठेऊन घेतले. यातील आमचा हिस्सा दे, अशी मागणी हे ग्रामस्थ करत आहेत. त्याचवेळी “मतदार म्हणतो मी पैसे घेतले नाहीत” यावर इतर सदस्य म्हणतात. “तू शंभर रुपयांसाठी स्वतः टेंडर भरतो, एव्हाना टॉयलेटला जातो तिथेही पैसे घेतो, तू एवढा मोठा पैसा सोडणार नाही” असे गमतीशीर किस्से यात आले आहेत.

तर इतर सदस्य म्हणतात, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्याकडून आलेले पैसे कुठे गेले? तक्रारदार म्हणतो मला मिळाले नाही, तुम्ही पैसे मागा, यावर दूध संघाचे सदस्य म्हणतात आपला ठराव झाला होता. “मतदान केल्यावर जे पाकीट मिळेल ते दूध संघात जमा होईल, ते सर्व सदस्य वाटून घेतील” या व्हिडिओ मधील भांडण हे एका गावात चव्हाट्यावर आले खरं, पण गावागावात हाच वाद दबक्या आवाजात सुरू आहे. पण तेरी भी चूप मेरी भी चूप अशीच अवस्था सर्वत्र आहे.

दरम्यान, जळगाव जिल्हा दूध संघात २ कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यावेळी महाजन गटाने खडसे गटावर केला होता. अशातच हा व्हिडिओ समोर आल्यावर ‘दोन कोटींच्या भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी निवडणुकीत २० कोटींचा चुराडा झाला’ अशा शेलक्या शब्दांत जळगावकर प्रतिक्रिया व्यक्त करताय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube