ग्रामपंचायत निवडणूक: शिंदे गटाला औरंगाबादमध्ये दुसरा मोठा धक्का

ग्रामपंचायत निवडणूक: शिंदे गटाला औरंगाबादमध्ये दुसरा मोठा धक्का

औरंगाबाद : जिल्ह्यात 208 ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले होते. आज सकाळी आकरा वाजता ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सुरवात झाली. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाला दोन मोठे धक्के बसले आहेत. पैठण तालुक्यातील शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची बनलेली बिडकीन ग्रामपंचायत ठाकरे गटाच्या ताब्यात गेली आहे. आता वैजापूर तालुक्यातील महालगावची ग्रामपंचायत देखील ठाकरे गटाच्या ताब्यात गेली आहे. शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.

महालगावात शिंदे गटाकडून मीना रजनीकांत नजन रिंगणात होत्या, तर ठाकरे गटाकडून रोहिणी नानासाहेब काळे मैदानात होत्या. अंतिम मतमोजणीवेळी रोहिणी काळे यांना 1354 मते पडली असून, मीना नजन यांना 1251 मते पडली आहे. त्यामुळे शिंदे गटाला पराभव स्वीकारावा लागला आहे. विशेष म्हणजे या ग्रामपंचायत निकालाकडे संपर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते.

आमदार बोरनारे यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर वैजापूर मतदारसंघातील अनेक शिवसैनिकांनी मात्र ठाकरे गटात राहणं पसंद केले होते. त्यामुळे अनेकदा बोरनारे यांना ठाकरे गटाकडून विरोध देखील झाला होता. तर ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी महालगावात एका कार्यक्रमासाठी गेलेल्या आमदार बोरनारे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकारी यांच्यात वाद झाला होता. या वादाचे व्हिडिओ देखील समोर आले होते. त्यामुळे या घटनेची राज्यभरात चर्चा देखील झाली होती. मात्र त्याच महालगावात आता ठाकरे गटाचा भगवा फडकला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube