थोरातांची गावे विखेंनी जिंकली; घुलेवाडी, जोर्वे, तळेगावात बसला धक्का
अहमदनगर – संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत थोरात-विखे गटातील राजकीय संघर्ष पाहायला मिळाले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे जन्म गाव असलेल्या जोर्वे गावासह तीन ग्रामपंचायतीतील सत्ता थोरात गटाला गमवावी लागली आहे. तर थोरात गटानेही निमगाव जाळी व उंबरी बाळापूर ग्रामपंचायतीत विखे गटाला प्रतिधक्के दिले आहेत.
संगमनेर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. यात थोरात गटाने २७, विखे गटाने ९, तर सोपान राऊत यांच्या गटाने घुलेवाडीत सरपंचपद मिळविले. जोर्वे हे आमदार थोरात यांचे गाव आहे. हे गाव शिर्डी विधानसभा मतदारसंघात मोडते. त्यामुळे या गावात विखे गटाचा हस्तक्षेप वाढला आहे. यातच राधाकृष्ण विखे पाटील हे राज्याचे महसूल मंत्री झाल्यानंतर या परिसरात विखे गटाची ताकद वाढली आहे.
विखे गटाने जोर्वे व तळेगावमध्ये थोरात गटाचे वर्चस्व मोडित काढत सत्ता मिळविली.
तर घुलेवाडीतील माजी सरपंच सोपान राऊत यांची सून निर्मला राऊत यांनी थोरात गटाचे प्राबल्य मोडित काढत सरपंचपद मिळविले आहे. संगमनेर तालुक्यातील थोरात गटाच्या ताब्यातील या तीन ग्रामपंचायतीतील सत्ता गेलेल्या आहेत. तर थोरात गटाने विखे गटाच्या ताब्यातील निमगाव जाळी व उंबरी बाळापूर सारख्या ग्रामपंचायतीतील सत्ता खेचून आणली आहे.