ही तर अमित शाहांची सरळ धमकीच ! काँग्रेसची बाजू घेत राऊतांचा भाजपवर हल्ला
Sanjay Raut on Amit Shah : कर्नाटक निवडणुकीतील (Karnataka Elections 2023) प्रचाराच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे चांगलाच गदारोळ उठला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी सडकून टीका केली आहे. तर काँग्रेसने थेट तक्रार दाखल केली आहे. शाह यांच्या वक्तव्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शहांवर जोरदार प्रहार केला आहे. शहा यांचे वक्तव्य म्हणजे सरळसरळ धमकीच आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले शहा ?
कर्नाटकमध्ये आयोजित एका प्रचार सभेत शहा म्हणाले,की काँग्रेस सत्तेत आल्यास घराणेशाहीचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू होईल. तसेच राज्यात दंगली होण्याचीही भीती आहे, असे शहा तेरडल येथील सभेत म्हणाले होते. त्यामुळे राजकीय स्थैर्यासाठी भाजपला (BJP) साथ देण्याचं आवाहन त्यांनी केलं.
Karnataka Election : राजकीय गणितं बदलणार?; माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर काँग्रेसमध्ये दाखल
या वक्तव्याचा राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, देशाचे पंतप्रधानही कानडी वेशभूषा करून कर्नाटकात फिरत आहेत. पण त्याचा त्यांना किंवा भाजपला काहीही फायदा होणार नाही. दुसऱ्या बाजूला कर्नाटकात काँग्रेस जिंकल्यास दंगली होतील हे देशाचे गृहमंत्री सांगत आहेत, हे खूप धोकादायक आहे. शाह लोकांना धमकी देत आहेत का, आम्हाला मतं द्या नाहीतर दंगली होतील.
ही अमित शाह यांची धमकी आहे. ते देशाचे गृहमंत्री असल्याने त्यांनी देशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलायला हवे. ते त्यावर का बोलत नाहीत, असा सवाल राऊत यांनी केला. पण कर्नाटक हरलो तर दंगली होतील हे वक्तव्य देशाच्या गृहमंत्र्याला शोभत नाही. दंगली होतील म्हणताय मग तुम्ही नेमकं काय करताय, असा प्रश्न राऊत यांनी केला.
मुख्यमंत्री साताऱ्यातही ऑनड्युटी; एकाच दिवसांत केला 65 फाईल्सचा निपटारा
दरम्यान, कर्नाटक विधानसभेसाठी 10 मे रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर 13 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येईल. यंदा सत्ताधारी भाजपला निवडणूक कठीण जात असल्याचे दिसत आहे. भाजपविरोधात काँग्रेस एकजूट दिसत आहे. तर दुसरीकडे जेडीएसनेही तुफान प्रचार चालविला आहे. यंदा राज्यात काँग्रेससाठी स्थिती अनुकूल असल्याचे काही सर्व्हेतून दिसून आले होते. त्यामुळे भाजप सावध झाला असून वरिष्ठ नेतेही राज्यात येऊन झंझावाती प्रचार करत आहेत.