सोमय्यांचा पाय खोलात! तो व्हायरल व्हिडिओ खरा, गुन्हे शाखेच्या सूत्रांची माहिती
Kirit Somaiya video updates : काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. सोमय्यांच्या या व्हिडिओ प्रकरणाचा परिणाम विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही दिसून आला होता. आता या व्हायरल व्हिडिओप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली. हा व्हिडिओ सोमय्या यांचाच असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे. त्यामुळं सोमय्यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. (Kirit Somaiya video updates somaiyas video is true)
याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आला होता. यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. 17 जुलैच्या रात्री एका मराठी वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त प्रसारित केले होते. या घटनेनंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले. दानवेंनी या व्हिडिओ संदर्भात एक पेन ड्राईव्ह देखील उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे देत खळबळ उडवून दिली होती.
राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली होती. या सगळ्या गदारोळानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली होती. यानुसार फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले असता पहिल्याच टप्प्यात हा व्हिडिओ खरा असल्याची माहिती पुढे आलीय.
व्हायरल व्हिडिओ प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी हा व्हिडिओ खरा असल्याचा दावा केला आहे. तपास पथकाने या व्हिडिओचे विश्लेषण केले आहे. संबंधित व्हिडिओ मॉर्फ केलेला नसून खरा असल्याचे आढळलं आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, हा ‘व्हिडीओ’ खरा असल्याचे स्पष्ट झाल्यास सोमय्या यांच्या राजकीय अडचणी वाढतील. दरम्यान, आता हा व्हिडिओ कोणी व्हायरल केला याचा तपास आता मुंबई पोलीस करत आहेत.