Lok Sabha Election : ‘शिंदे अन् अजित पवार गटाला किती जागा देणार?’ फडणवीसांनी ठरलेलं सांगितलं

Lok Sabha Election : ‘शिंदे अन् अजित पवार गटाला किती जागा देणार?’ फडणवीसांनी ठरलेलं सांगितलं

Lok Sabha Election : राज्यात महायुतीचं सरकार आहे. एकनाथ शिंदे यांच्यानंतर अजित पवार गट सत्तेत सहभागी आहे. या तिन्ही पक्षांचं ट्रिपल इंजिन सरकारमध्ये कोणताही विसंवाद नाही असे नेतेमंडळी नेहमीच सांगत असतात. अशातच आता लोकसभा निवडणुका जवळ (Lok Sabha Election) आल्याने जागावाटपासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. या निवडणुकांतील जागावाटपाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महत्वाचे वक्तव्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप जवळपास निश्चित झालं आहे. भाजपा 26, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 22 जागा लढविणार आहे, अशी माहिती फडणवीस यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत दिली.

Loksabha : भाजपच्या योजनांना शिंदेंचा सुरुंग; 22 जागांवर दावा केल्याने अजितदादांनाही टेन्शन

विद्यमान खासदारांची धाकधूक वाढणार 

2019 मधील निवडणुकीत भाजपाने 25 जागांवर तर शिवसेनेने 23 जागांवर निवडणूक लढली होती. यामध्ये भाजपला 23 आणि शिवसेनेच्या 18 उमेदवारांचा विजय झाला होता. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा सर्व्हे करण्यात आला आहे. विजयी होतील अशा उमेदवारांची माहिती आम्हाला मिळाली आहे. तसं पाहिलं तर 2019 मध्ये निवडून आलेल्या खासदारांनाच पुन्हा तिकीट दिलं जाईल अशी परंपरा आहे पण, हा अंतिम शब्द नाही असे स्पष्ट करत फडणवीसांनी विद्यमान खासदारांची धाकधूक वाढवली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकी महायुतीचे उमेदवार राज्यातील 40 ते 42 जागांवर विजय होतील. कारण, देशातील जनता आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी आहे, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

Sunil Tatkare : 2009 ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढणार होती; तटकरेंचा गौप्यस्फोट

नागपूरमधूनच विधानसभा लढणार 

मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे की देवेंद्र फडणवीस केंद्राच्या राजकारणात जातील तसेच लोकसभा निवडणूकही लढतील. मात्र, फडणवीस यांनी या चर्चांना कधीच दुजोरा दिला नाही. आताही त्यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडत यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मी विधानसभेचीच निवडणूक लढणार आणि ती सुद्धा नागपूरमधूनच. दहा वर्षांनंतर देखील मी भाजपमध्येच काम करेल आणि पक्ष सांगेल तिकडं काम करेल असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले.

दरम्यान, नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक लढण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर उत्तर दिलं. पुढील दहा वर्षात तुम्ही स्वतःला कुठे पाहता असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर फडणवीसांनी मी भाजपासोबतच राहिल आणि पक्ष देईल ती कोणतीही जबाबदारी मी पार पाडेल. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube