दलबदलूचे राजकारण नाकारले; सर्वाधिक ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा – जयंत पाटील
नागपूर : महाराष्ट्रात अधिकृत घोषित झालेल्या ग्रामपंचायत निवडणुक निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जवळपास १ हजार ३०० ग्रामपंचायतीवर आणि महाविकास आघाडीचे इतर दोन घटक पक्ष लक्षात घेता २ हजार ६५१ ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना दिली.
शिवसेना आणि भाजप यांच्या मिळून साधारणपणे २ हजार २०० ग्रामपंचायतीवर झेंडा फडकला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ग्रामीण भागातील जनतेने फार मोठ्याप्रमाणावर साथ दिली आहे असेही जयंत पाटील म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावात राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे त्यामुळे आपल्या लक्षात येईल की दलबदलूचे राजकारण महाराष्ट्र मान्य करत नाही. साम-दाम-दंड-भेद वापरून, सत्ता वापरून, सत्तेचा दुरुपयोग करून देखील महाविकास आघाडीचा पराभव भाजप व शिंदे गट करु शकत नाही हे आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात सिध्द झाले आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
अजून काही १ हजार ४०० ग्रामपंचायतीचे निकाल यायचे आहेत. त्यामुळे भाजप-शिंदे गटातील अंतर वाढेल. महाराष्ट्रातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना या पक्षांना पुन्हा एकदा प्राधान्य दिले आहे अशी खात्री व्यक्त करतानाच जयंत पाटील यांनी महाराष्ट्रातील जनतेचे जाहीर आभार मानले आहेत.