शरद पवारांच्या सभेची अजितदादांना धास्ती, आधीच केला अजेंडा क्लिअर; म्हणाले, आम्ही…
Ajit Pawar : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी खुद्द शरद पवारच (Sharad Pawar) मैदानात उतरले आहेत. आधी येवला, नंतर बीड आणि आता कोल्हापुरात जाहीर सभा 25 ऑगस्टला होणार आहे. या सभेआधी राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. या सभेतून शरद पवार काय भूमिका मांडणार अशी चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार यांनी कुठे सभा घ्यावी?, हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. आम्हाला जे योग्य वाटतं, ते करण्याचा आमचा प्रयत्न असतो. आम्ही अनेक वर्षे काम करणारे कार्यकर्ते आहोत. प्रशासनावर पकड असणारे कार्यकर्ते आहोत. तुम्ही खासगीत कुणालाही विचारा.. आम्ही आमचा टेंभा मिरवतोय, असं कृपा करून समजू नका. काही वेळेस विचारधारा वेगळी असू शकते. सत्ता ही लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठीच असते, असे अजित पवार म्हणाले.
अजितदादा अन् शिंदे सत्तेत का गेले? चव्हाणांनी सांगितलं आतलं राजकारण
ते चालतात मग आम्ही का नाही?
अजित पवार म्हणाले, काही वेळेस विचारधारा वेगळी असते. जसे 2019 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने विचारधारा बाजूला ठेवून शिवसेनेशी आघाडी केली होती. शिवसेना-भाजप हे 25 वर्षांपासून मित्रपक्ष होते. त्यांचा मित्र पक्ष अडीच वर्ष चालू शकतो. तर दुसरा राहिलेला मित्रपक्ष का चालू शकत नाही. आम्ही वेगळे आहोत. हे दाखवायला नको. शेवटी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहेत. शेवटी लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. तेही मानले पाहिजे, असे अजित पवारांनी म्हटले आहे.
भाजपसोबत युती करण्याचा निर्णय शरद पवारांच्या संमतीने घेतला का?
भाजपबरोबर युती करण्याचा निर्णय शरद पवारांच्या संमतीशिवाय घेतला का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले, लोकशाहीत बहुमताचा आदर करायचा असतो. लोकशाहीची हीच खरी पद्धत आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी बहुमताने हा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नसल्याचे आधीच सांगितले होते.