Akole Long March : मोर्चा थांबविण्यासाठी विखे पाटील मैदानात; मोर्चेकऱ्यांना केली ‘ही’ विनंती
Akole Long March : किसान सभेच्या नेतृत्वात अकोले ते लोणी असा पायी लाँग मार्च (Long March) काढण्यात येत आहे. खारघर येथे घडलेली दुर्घटना पाहता कडाक्याच्या उन्हाचा विचार करून मोर्चा स्थगित करावा असे आवाहन प्रशासनाने केले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सुद्धा मोर्चा स्थगित करण्याचे आवाहन केले. मात्र, मोर्चेकरी ठाम असून प्रशासनाने केलेले आवाहनास नकार दिल्याचे समजते.
शेतकरी, शेतमजूर, कामगार व श्रमिकांचे विविध प्रश्न घेऊन दोन महिन्यांपूर्वी अखिल भारतीय किसान सभेने नाशिक ते मुंबईपर्यंत लाँगमार्चचे आयोजन केले होते. हा मार्च मुंबईच पोहोचण्याआधीच सरकारने केलेल्या मध्यस्थीमुळे स्थगित केला होता. त्यानंतरही आंदोलकांच्या मागण्या कायम असल्याने किसान सभेचे निमंत्रक कॉ. अजित नवले यांनी आज (26 एप्रिल) अकोले ते लोणी पायी मोर्चा व त्यानंतर लोणीत महामुक्काम आंदोलनाचे आयोजन केले आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नगर व नाशिक जिल्ह्यातील अनेक आदिवासी व शेतकरी अकोल्यात दाखल झाले आहेत.
Akole Long March : किसान सभेच्या मोर्च्याला पोलिसांची नोटीस, आंदोलक मात्र मोर्चावर ठाम
मात्र सध्याचा कडाक्याचा उन्हाळा आणि खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमातील दुर्घटना यांचा विचार करता हा मोर्चा स्थगित करावा यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी नवले यांची भेट घेतली. त्यांना विनंती केली. पदयात्रेचा कालावधी दुपारी तीननंतर सुरू करून शक्यतो सावली आणि रात्रीचा पर्याय देण्यात आला. मात्र तरीही हा मोर्चा निघू नये अशीच प्रशासनाची भूमिका आहे. मात्र, आंदोलक अजून तरी ठाम असल्याचे दिसत आहे.
मोर्चा स्थगित करा – महसूलमंत्री विखे
किसान सभेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून, शेतक-यांच्या प्रतिनिधींशी प्रदिर्घ चर्चा केली आहे. हे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांना दिले आहे. फार प्रतिष्ठेचा प्रश्न न करता हा मोर्चा स्थगित करावा असे आवाहन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. शेतकऱ्यांना आपल्या मागण्यांसाठी मोर्चा काढण्याचा पूर्णपणे आधिकार आहे. नाशिक ते मुंबई असा लॉंगमार्च शेतकऱ्यांनी काढला होता. त्याचवेळी त्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पातळीवर चर्चा होवून हे प्रश्न सोडविण्याबाबत त्यांना आश्वासन दिले होते.
Weather Update : पुढील 3-4 तास काळजी घ्या, ‘या’ जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
शेतकरी प्रतिनिधीं समवेत साडेचार तास बैठक करुन प्रत्येक मुद्यावर चर्चा केली आहे, त्यांच्या शंकांचे निरसन केले आहे. महसूल विभागाच्या संदर्भात असलेल्या त्यांच्या मागण्यांबाबत प्रशासनास काही आदेशही दिले आहेत. वनजमीनींवरील अतिक्रमण काढण्याला स्थगितीही दिली असल्याचे मंत्री विखे म्हणाले. उर्वरित मागण्यांबाबत असलेल्या कायद्याच्या अडचणी दूर करण्यासाठी थोडा कालावधी द्यावा लागेल.
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. परंतु आजच सर्व मागण्या मान्य कराव्यात असा आग्रह धरणे योग्य नाही. इतर विभागाच्या संदर्भात असलेल्या मागण्यांबाबत संबधित मंत्र्यांशी चर्चा करावी लागेल. आज सर्वच तालुक्यांमध्ये बाजार समित्यांच्या निवडणूका सुरु आहेत. त्या विभागाचे मंत्री सुद्धा निवडणूक प्रक्रियेत आहेत. त्यामुळे पुन्हा ३ मे रोजी या प्रश्नांबाबत चर्चा करण्याबाबत आपण काल या शेतकरी प्रतिनिधींशी बोलणी आयोजित केली आहे.