पालकमंत्रिपदाचा वाद भाजपाच्या पथ्यावर, शिंदेसेनेला रायगड; मनपा निवडणुकीआधीच मुंबई टिपणार…

पालकमंत्रिपदाचा वाद भाजपाच्या पथ्यावर, शिंदेसेनेला रायगड; मनपा निवडणुकीआधीच मुंबई टिपणार…

Maharashtra Politics : महायुती सरकारच्या पालकमंत्र्यांची यादी काही दिवसांपूर्वी जाहीर झाली होती. यात रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या मंत्रिपदावरून प्रचंड वाद झाला. रायगडमध्ये भरत गोगावले आणि नाशकात दादा भुसे या मंत्र्यांना डावलण्यात आल्याने प्रचंड नाराजी पसरली होती. रायगडमध्ये तर या राजकारणाचे संतप्त पडसाद उमटले होते. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली होती. हा तिढा कसा सोडवायचा असा प्रश्न महायुतीच्या नेत्यांसमोर होता. आताच मिळालेल्या माहितीनुसार यावर तोडगा काढण्यात आला आहे. यातही भाजपने मोठी खेळी केल्याची चर्चा आहे.

रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद शिंदेसेनेला देऊन त्यांच्याकडील मुंबईचं पालकमंत्रिपद काढून घ्यायचं असं ठरल्याची माहिती आहे. भरत गोगावले आणि तटकरे यांच्यातील वादावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने असा बदल केला जाऊ शकतो. भरत गोगावले महायुती सरकारमध्ये मंत्री आहेत. तर रायगडमधीलच अदिती तटकरे देखील मंत्री आहेत. त्यामुळे या जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून वाद सुरू आहे.

रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत कलगीतुरा; गोगावले म्हणाले, कुणी अंगावर आल तर त्याला..

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी आधी मंत्री अदिती तटकरे यांचं नाव जाहीर झालं होतं. त्यामुळे शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले कमालीचे नाराज झाले होते. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली होती. तरीही गोगावले आणि तटकरे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरुच होते. इतकेच नाही तर महाड विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले होते. मुंबई गोवा महामार्गावर टायर जाळून शिवसैनिकांनी निदर्शनेही केली होती. यावर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू होते. आता या वादावर तोडगा निघेल अशी परिस्थिती तयार झाली आहे. रायगडचं पालकमंत्रिपद एकनाथ शिंदे गटाला मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

जर रायगडचं मंत्रिपद शिंदे गटाला दिले तर त्यांच्याकडील मुंबईचं पालकमंत्रिपद आपल्याकडे घ्यायचं अशी भाजपाची रणनीती आहे. परंतु, अजित पवार गटाकडून या अदलाबदलीला संमती दिली जाणार का हा प्रश्न आहे. कारण या राजकारणात अजित पवार गटाचं नुकसान होणार आहे. रायगड जिल्ह्यात तटकरेंचा दबदबा आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्याचं पालकत्वच सोडून द्यायचं झालं तर हा निर्णय त्यांच्यासाठी धाडसाचाच ठरणार आहे. यावर आता खासदार सुनील तटकरे आणि महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

एकवेळ फडणवीस-ठाकरे एकत्र येतील..पण तटकरे-गोगावलेंचे सूर जुळणे अशक्य!

follow us
  • fb
  • instagram
  • youtube