राष्ट्रवादीच्या आमदारांना गिफ्ट, शिंदे गटालाही केलं खूश; अजितदादांनी दिला कोट्यवधींचा निधी
Ajit Pawar News : महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थखात्याची धुरा सांभाळणारे आणि निधी वाटपाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे गटाच्या रडारवर आलेले आताच्या सरकारमधील अर्थमंत्री अजित पवार यांनी निधी वाटपात कमालीचा बॅलन्स साधला आहे. निधीवाटपात अजितदादांनी जुनीच चाल खेळली. बंडखोरीत साथ देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना २५ कोटींचा बक्कळ निधी दिला. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांची नाराजी उफाळून येणार नाही याची काळजी घेत त्यांच्या वाट्याचा निधी त्यांना देऊन टाकला.
Pankaja Munde : ‘पंकजांना भाजपमध्ये जास्त त्रास झाला तर’… भाऊ जानकरांचा निर्वाणीचा इशारा
विशेष म्हणजे, अजित पवारांना टोकाचा विरोध करणारे तसेच बंडाच्या काळात अजित पवार गटातील आमदार, पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणारे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्याही मतदारसंघांसाठी अजितदादांनी निधी दिला आहे.
अजित पवार यांच्या या निर्णयामुळे निधी मिळण्याची वाट पाहणारे आमदा खूश झाले आहेत. शिंदे गटाच्या नेत्यांचीही नाराजी घालविण्यात यश मिळवले आहे. अजित पवार यांना बंडखोरीत ज्या आमदारांनी साथ दिली त्यांच्या मतदारसंघांतील विकासकामांसाठी २५ कोटी किंवा त्यापेक्षा जास्त निधी मंजूर केला आहे.
विधीमंडळात सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये भाजप-शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या आमदारांच्या मतदारसंघांतील विकासकामांसाठी दीड हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीवाटपात शिंदे गटाच्या आमदारांचीही काळजी घेण्यात आली आहे.
अजितदादा मुख्यमंत्री होणार का? गिरीश महाजनांनी खरं काय सांगूनच टाकलं
महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर आमदारांना विकासकामांसाठी निधी मिळत नव्हता. आमदारांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात होत्या. पण, त्यानंतर राजकारणात उलथापालथ झाली आणि अजितदादा थेट सरकारमध्येच सामील झाले. अपेक्षेप्रमाणे त्यांच्याकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आल्या. मग त्यांनीही आमदारांना निधी वाटपात हात ढिल्ला सोडला. अजितदादांना पाठिंबा देण्यामागे निधी वाटप हे देखील एक कारण असल्याचे आता समोर आले आहे. आमदारही आता तसे उघडपणे बोलून दाखवत आहेत. निधीवाटपात राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांना गिफ्ट तर शिंदे गटाच्या आमदारांनाही केलं खूश अशीच परिस्थिती दिसून येत आहे.
शिंदे गटाचं काय ?
महाविकास आघाडीचे सरकार असताना अजित पवार अर्थमंत्री होते. पण, त्यांच्याकडून निधी वाटपात दुजाभाव केला जातो. निधी मिळत नाही अशा तक्रारी करत शिंदे गटाच्या आमदारांनी बंडखोरी केली होती. आता नव्या सरकारमध्ये अजित पवार पुन्हा अर्थमंत्री झाले आहेत. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याच हातात आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी शिंदे गटाचे आमदार मागील वेळी नाराज झाले होते तसे आता होणार नाहीत याची काळजी घेतली आहे. नाराजी टाळण्यासाठी दीड हजार कोटींच्या तरतुदीतून राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघांतील विकासकामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.