‘संभाजी भिडेंना अटक करा’; भिडेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर भुजबळांचा संताप
Chagan Bhujbal : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) गुरुजी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर संभाजी ब्रिगेडने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ भडकले आहे. देशद्रोहाच्या आरोपाखाली संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.
पंकजा मुंडेंचं भविष्य रामदास आठवलेंनी सांगितलं; BRS प्रवेशाच्या चर्चांवर म्हणाले…
भुजबळ यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संभाजी भिडे यांनी देशाला मिळालेले स्वातंत्र्य आणि राष्ट्रध्वजाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, संभाजी भिडे यांना देशद्रोहाच्या आरोपावरून अटक व्हायला पाहिजे. एवढं जर दुसरी कुणी बोललं असतं तर आतापर्यंत त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली गेली असती. मग यांच्यावर का कारवाई होत नाही. ते वाट्टेल ती बडबड करतात. बहुजन समाजाच्या पोरांना फितविण्याचे काम चाललं आहे, असा आरोपही त्यांनी भिडे यांच्यावर केला.
याआधी संभाजी ब्रिगेड संघटनेनेही भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता भुजबळ यांनीही भिडेंविरोधात मोर्चा उघडला आहे. त्यामुळे भिडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले होते संभाजी भिडे?
15 ऑगस्ट हा भारताचा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. या दिवशी देशाची फाळणी झाली होती. त्यामुळे या दिवशी सर्वांनी उपवास कारावा आणि दुखवटा पाळावा, असे सांगून त्यांनी तिरंग्याच्या हिरवा आणि पांढऱ्या रंगावरवरही आक्षेप घेतला. जन, गण, मन हे पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी टागोरांना सुचलं होतं. काय लायकीचे लोकं, काय लायकीचं स्वातंत्र्य अन् काय झेंडावंदन असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित करीत 1947 मध्ये मिळालेलं ते हांडगं स्वातंत्र्य असून 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मानू पण फक्त दखलपात्र म्हणून, असं ते म्हणाले होते.