काँग्रेसचं ‘टार्गेट’ सांगत पटोलेंनी कार्यकर्त्यांना दिलं ‘टॉनिक’; मित्रपक्षांनाही दिला इशारा

काँग्रेसचं ‘टार्गेट’ सांगत पटोलेंनी कार्यकर्त्यांना दिलं ‘टॉनिक’; मित्रपक्षांनाही दिला इशारा

Nana Patole : छत्तीसगड, राजस्थान, हिमाचल प्रदेश व कर्नाटकमध्ये काँग्रेस विचारांचे सरकार आहे. या राज्यात शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबवल्या जात आहे, नोकरीचे प्रश्न सोडवले जात आहेत. भाजपाच्या राज्यात मात्र नोकऱ्या संपवण्यात आल्या. धनगर समाजाला २०१९ मध्ये आरक्षण देणार होते पण अजून दिलेले नाही. कर्नाटकात जसा भाजपाचा (BJP) पराभव करुन काँग्रेसची सत्ता आली त्यापेक्षा मोठा विजय मिळवत महाराष्ट्रातही काँग्रेसची सत्ता आणण्याचा आमचा संकल्प आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले. सांगलीमध्ये आज काँग्रेसचा महानिर्धार शेतकरी संवाद आणि कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्याला कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) उपस्थित होते.

दरम्यान, या मेळाव्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार आणण्याचे आवाहन लोकांना केले. त्यापाठोपाठ पटोले यांनीही काँग्रेसचे सरकार आणण्याचा संकल्प आम्ही केल्याचे म्हटले. त्यामुळे महाविकास आघाडीत त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी याआधीही स्वबळाचे संकेत दिले होते.  याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात खासदार सुनील तटकरे यांनी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर एक करण्यासाठी संकल्प केला असल्याचे म्हटले होते.

‘शिंदे-फडणवीसांचे भ्रष्ट सरकार उखडून टाका’, सांगलीतून सिद्धरामय्या गरजले

या मेळाव्यात काँग्रेस नेत्यांनी राज्यातील शिंदे फडणवी सरकारवर घणाघाती टीका केली. तसेच आगामी निवडणुकीत या सरकारला घरी बसविण्याचे आवाहन लोकांना केले. यावेळी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदींसह काँग्रेस नेते, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पटोले पुढे म्हणाले, भाजपा आपल्या देवी देवतांचा वापर फक्त निवडणुकीत मते मागण्यासाठी करत असतो आणि निवडणुका होताच याच देवांचा अपमान करतो. कर्नाटकात भाजपाला भगवान श्रीराम व बजरंगबली यांनीच जागा दाखवून दिली. आता आदिपुरुष चित्रपटात भगवान श्रीराम व हनुमानाचा अपमान केला आहे. पंढपुरात जागोजागी पोस्टर लावले आहेत त्यातही पांडुरगांचा अपमान केला आहे. हे सरकार आपल्या दैवतांचा अपमान करत आहे, जनतेचा अपमान करत आहे.पांडुरंगाचा अपमान करणारे बोर्ड तातडीने काढून टाका, अशी मागणी पटोले यांनी केली.

भ्रष्ट सरकार उखडून टाका, काँग्रेसची सत्ता आणा – सिद्धरामय्या

भाजप जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद घडवून सामाजिक शांतता भंग करत आहे तसेच संघ परिवाराचे लोकही धर्मा-धर्मात वाद लावून दंगे घडवतात आणि त्यात सामान्य जनता मात्र भरडली जात आहे. भाजप म्हणजे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार म्हणजे भाजपा असे समीकरण आहे. कर्नाटकात ४० टक्के कमिशन दिल्याशिवाय कोणतेच काम होत नव्हते. कर्नाटकच्या जनतेने भ्रष्टाचारी भाजपाला घरी बसवले, महाराष्ट्रातही शिंदे-फडणवीस सरकार अत्यंत भ्रष्ट आहे, हे भ्रष्ट सरकारही उखडून टाका व काँग्रेसची सत्ता आणा, असे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले.

मराठी भाषिकांना न्याय अन् दुष्काळी जतला पाणी द्या; विश्वजीत कदमांचं सिद्धरामय्यांना साकडं

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube