‘सोर्सेसची नावं हवी असतील तर त्यांच्या जीविताची हमी घ्या’; 500 कोटींच्या प्रकरणावर जरांगे पुन्हा बोलले
Manoj Jarange; ऑडिओ क्लिपमधील आवाजांचे सोर्सेस उघड करण्याची मागणी झाली तर संबंधित व्यक्तींच्या जीविताची हमी सरकारने घ्यावी, असे जरांगे म्हणाले
Manoj Jarange 500 Crore Audio Clip Case: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणावरून प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करण्याबाबत आपल्याला पत्र आल्याचं सांगतानाच, ऑडिओ क्लिपमधील आवाजांचे सोर्सेस उघड करण्याची मागणी झाली तर संबंधित व्यक्तींच्या जीविताची हमी सरकारने घ्यावी, असं आव्हान जरांगे यांनी दिलं आहे. ‘मला वाटत नाही की सरकारला सोर्सेसची गरज असेल. मात्र, सोर्सेसची नावं हवी असतील तर त्यांच्या जीविताची हमी घ्या’, असं जरांगे म्हणाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला.
Gopichand Padalkar : जयंत पाटील झोपलेत की जागे, पाहत होते…गोपीचंद पडळकरांचा खोचक टोला!
माझ्या विरोधात बोलणाऱ्यांचे धनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री
500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात कोण कुणाला मॅनेज होऊन बोललं आहे, हे आता सगळ्यांना कळालं आहे. मी कुणालाही वाईट बोललेलो नाही. मात्र, माझ्या विरोधात बोलणाऱ्यांचे धनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेच आहेत, असा आरोप जरांगे यांनी केला. दरम्यान, सोलापूरमधील प्रकरणाबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
दिवाळीनंतर आंदोलनाची दिशा ठरवणार
दिवाळीत कोणताही धमाका करणार नसल्याचं सांगत जरांगे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला पुन्हा इशारा दिला. राज्य सरकारने शेतकऱ्यांना जाणूनबुजून केवळ 5 हजार रुपयांची मदत दिली असून, यापुढे सरकारकडून आणखी मदत मिळणार नाही, हे शेतकऱ्यांनाही माहिती आहे, असं ते म्हणाले. दिवाळीनंतर सर्व शेतकरी संघटनांची बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
वेळ पडली तर दांड्याने मारू आणि जेलमध्ये जाऊन बसू
‘शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत मिळवून घेणार, अन्यथा मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. वेळ पडली तर दांड्याने मारू आणि जेलमध्ये जाऊन बसू’, असा आक्रमक इशाराही जरांगे यांनी दिला. मात्र, शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत, संकटांवर मात करून जगलं पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं.
ताकद आल्यानंतर मोठी दिवाळी साजरी करू
‘जशी होईल तशी दिवाळी साजरी करा. ताकद आल्यानंतर मोठी दिवाळी साजरी करू’, असं म्हणत जरांगे यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी, असंही ते म्हणाले.