विधान परिषदेत मिटकरींचे मोदींबद्दल आक्षेपार्ह विधान, मिटकरींकडून दिलगिरी व्यक्त

विधान परिषदेत मिटकरींचे मोदींबद्दल आक्षेपार्ह विधान, मिटकरींकडून दिलगिरी व्यक्त

नागपूर : विधान परिषदेत आज राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंतप्रधान मोदींबद्दल वादग्रस्त उल्लेख केल्याचं पाहायला मिळालं. सोलापूरातील पंढरपूर कॉरिडोरचा विषय मांडत असताना अमोल मिटकरी यांच्याकडून मोदींचा रावण असा उल्लेख करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्षेप घेतल्यानंतर मिटकरी यांनी लगेचच माफी मागितली आहे.

दरम्यान, नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमकी उडताना दिसत आहेत. अशातच अमोल मिटकरींनी असा उल्लेख केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना चांगलेच सुनावले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी शिंदे यांनी सभागृहात नाराजी व्यक्त केली आणि मिटकरींना संसदीय संस्कृतीची आठवण करून दिली. ते म्हणाले, देशाच्या पंतप्रधानांचा आदर राखणे हे एक नागरिक आणि जनतेचा प्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य आहे.

पंतप्रधान देशाचे नेतृत्व करत असताना त्यांच्याबाबत सभागृहात असे विधान करणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून बोलताना आपण तारतम्य बागळले पाहिजे, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी मिटकरी यांना खडेबोल सुनावले.

मात्र, अमोल मिटकरींच्या विधानावरून विधान परिषदेत जोरदार गोंधळ झाला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी हस्तक्षेप करत अमोल मिटकरी यांनी केलेले विधान पटलावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.

यावेळी सत्ताधाऱ्यांनी अमोल मिटकरी यांच्या माफीनाम्याची मागणी केली. त्यानंतर त्यानंतर अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube