Nashik Graduate Constituency : नगरची ‘ती’ अदृश्य शक्ती तांबे यांच्या पाठीशी…प्रचारासाठी उतरली मैदानात

Nashik Graduate Constituency : नगरची ‘ती’ अदृश्य शक्ती तांबे यांच्या पाठीशी…प्रचारासाठी उतरली मैदानात

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी अनेक पक्षांकडून मोठ्या राजकीय हालचाली करण्यात आल्या. यातच या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना अप्रत्यक्षपणे भाजपकडून पाठिंबा देण्यात आल्याच्या चर्चा आता समोर येऊ लागल्या आहेत. विशेष म्हणजे विखेंच्या समर्थकांनी स्टेस्टस ठेवत तांबे यांचा प्रचार सुरु केला आहे.

सुरुवातीपासून नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे हे चर्चेत होते. सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांना काँग्रेसकडून निवडणुकीची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र सुधीर तांबे (Sudheer Tambe) यांनी अर्ज दाखल केला नाही. त्यांनतर सत्यजित यांनी अपक्ष म्हणून या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला.

त्यानंतर काँग्रेसकडून दोघांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली. सत्यजित यांनी पत्रकार परिषद घेत आपल्याला पाठिंबा जाहीर करावा असे आवाहन केले होते. दरम्यान भाजपकडून सत्यजित यांना जाहीररीत्या पाठिंबा देण्यात आला नाही. मात्र तांबेंच्या विजयासाठी भाजपच्या नेतेमंडळींकडून वरिष्ठ पातळीवर हालचाली मात्र सुरु झाल्या होत्या.

यातच सध्याच्या राजकीय वातावरणानुसार भाजपकडून तांबे यांना पाठिंबा देण्याच्या हालचाली सुरु झाल्याचं दिसून येतंय. भाजप नेते, आमदार राम शिंदे नुकतेच म्हणाले होते की, यासंबंधी स्थानिक पातळीवर चर्चा करून नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil) निर्णय जाहीर करणार आहेत.

तसेच शिंदे पुढे म्हणाले, हा अपक्ष उमेदवार आमच्या नगर जिल्ह्यातील आहे. आमचा स्थानिक पातळीवरील विषय आहे. त्यामुळं आता स्थानिक पातळीवर चर्चा करून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील निर्णय घेतील. तसेच दुसरीकडे विखे कार्यकर्ते तांबे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहे. विखे कार्यकर्त्यांकडून तांबे यांच्या प्रचाराचे स्टेट्स ठेवत त्यांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली असल्याचे यामाध्यमातून दिसून येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube