Shubhangi Patil : नाशिक पदवीधर निवडणुकीचं वातावरण तापलं, शुभांगी पाटलांचा सत्यजित तांबेंवर निशाणा

Shubhangi Patil : नाशिक पदवीधर निवडणुकीचं वातावरण तापलं, शुभांगी पाटलांचा सत्यजित तांबेंवर निशाणा

धुळे : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उद्धव ठाकरे शिवसेना पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांनी आज धुळे शहरातील शिवसेना कार्यालयात शिवसैनिकांची भेट घेतलीय. यावेळी त्यांनी सत्यजित तांबे यांच्याविरोधी उमेदवारावर चांगलाच निशाणा साधलाय. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सत्यजित तांबे यांनी केलेल्या ट्वीटला वारसानं संधी मिळते परंतु कर्तुत्व मात्र सिद्ध करावा लागते, याला प्रत्युत्तर देताना विरोधक उमेदवार शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबे यांचा समाचार घेतलाय.

शुभांगी पाटील म्हणाल्या, की शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आझाद मैदानावर उतरले होते. माझं कर्तुत्व सर्वांनी पाहिलंय. त्यामुळं येणाऱ्या 2 तारखेला वारसाला मिळतं की कर्तुत्वाला मिळतं, हे जनता दाखवेलच असे म्हणत शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबे यांना टोला लगावला आहे.

कपिल पाटील यांना सत्यजित तांबे यांच्या दिलेल्या पाठिंब्यावर बोलताना शुभांगी पाटील यांनी कपिल पाटील हे शिक्षक आमदार आहेत, त्यांना हाडाची शिक्षिका दिसली नसावी, असे म्हणत काम करणाऱ्यांना संधी न देता त्यांना आणखी दुसरा काही विचार त्यांनी केला असावा असे म्हणत शुभांगी पाटील यांनी कपिल पाटील यांच्या पाठिंब्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. कपिल पाटील यांच्या पाठिंब्याचा फारसा परिणाम या निवडणुकीदरम्यान पडणार नसल्याचे शुभांगी पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

सत्यजित तांबे यांनी केलेल्या भावनिक ट्विटवरून देखील शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबे यांच्याकडून केलेले ट्विट म्हणजे मतदारांशी डीलच सुरू असल्याचा आरोप केलाय. तुम्ही जर मला माझ्या पडत्या काळात साथ दिली, तर माझा पुढील काळ हा संपूर्ण साथ देणाऱ्यांसाठी असेल असे म्हणत मतदारांशी डील सध्या सत्यजित तांबे यांच्याकडून केल जात असल्याचा आरोप देखील पाटील यांनी केलाय. सध्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यावरून सुरू असलेल्या पेचाविषयी मातोश्रीवरून उद्धव ठाकरे व संजय राऊत हे लवकरच महाविकास आघाडीच्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मनवतील व मला महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळेल असा विश्वास यावेळी शुभांगी पाटील यांनी व्यक्त केलाय.

सुधीर तांबे यांनी नुकतेच धुळ्यात येऊन ज्या टीडीएस संघटनांचा पाठिंबा आपल्याला मिळाल्याचं स्पष्ट केलंय. त्याच टीडीएस संघटना पुरोगामी विचाराच्या असून त्या भाजप पुरस्कृत उमेदवाराला पाठिंबा देणार नाही, असं म्हणत टीडीएस संघटनेच्या सत्यजित तांबे यांच्या पाठिंबावर देखील शुभांगी पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. शिवसेनेच्या शिक्षक संघटनेसह विविध संघटना या आपल्या सोबत असल्याचं सांगत त्यांच्यासोबत असलेल्या संघटनांचा उल्लेख देखील यावेळी शुभांगी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केलाय.

सुधीर तांबे यांनी काँग्रेसची उमेदवारी डावलली हे राजकारणाचे डावपेच असल्याचं धुळ्यात बोलल्यानंतर या वक्तव्यावर देखील शुभांगी पाटील यांनी निशाणा साधत, राजकारणाचे डाव जनतेसोबत खेळल्यास जनता त्याचं उत्तर जरूर देते, असं म्हणत सुधीर तांबे यांच्या वक्तव्याचा देखील समाचार शुभांगी पाटील यांनी घेतलाय. दोन तारखेला विजयाचा गुलाल हा उद्धव ठाकरे शिवसेनेनं पाठिंबा दिला असला तरी हा विजयाचा गुलाल महाविकास आघाडीचा असेल, असं शुभांगी पाटील यांनी स्पष्ट केलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube