राजकीय गणितं बदलणार; शरद पवारांच्या विधानाचा नेमका अर्थ काय?
Sharad Pawar On Mahavikas Aaghadi : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये वेगवेगळ्या राजकीय चर्चा केल्या जात आहेत. त्यामध्ये अजित पवार हे भाजपसोबत जाणार ही एक चर्चा होय. या चर्चेमुळे राज्यातील वातावरण चांगलेच ढवळूण निघाले आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार हे नॉट रिचेबल झाल्याची चर्चा होती. त्यांनी अचानकपणे आपले सगळे कार्यक्रम रद्द केले होते. त्यानंतर मला अॅसिडीटीचा त्रास असल्याने मी आराम करत असल्याचे त्यांनी सांगितले होते.
यानंतरही परत अजितदादांनी मुंबईत आमदरांची बैठक बोलावल्याची चर्चा होती. यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच राहणार, असे स्पष्टीकरण अजितदादांनी दिले होते. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यांनी केलेल्या या विधानावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Sanjay Raut : आम्ही जी नशा करतो, ती तुम्हाला पराभूत करण्याची नशा; तुम्ही द्वेषाची भांग पिऊन बोलता
शरद पवार यांनी अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना एक विधान केले होते. 2024 साली महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार का? यावर त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी भाष्य केले आहे. आम्ही एकत्र लढणार वगैरे बोलायचे झाले तर, आज आमची आघाडी एकत्र आहे. आम्हाला एकत्र लढायची इच्छा आहे. पण फक्त इच्छाच नेहमी पुरेशी नसते. जागांच वाटप, त्यात काही अडचणी आहेत की नाही यावर अजून चर्चा केलेली नाही. त्यामुळे यावर कसं सांगता येईल?, असे पवार म्हणाले आहेत.
पवारांच्या या विधानाने महाविकास आघाडी राहणार की तुटणार या चर्चांन वेग आला आहे. याचे कारण गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरु असताना आता शरद पवारांनी देखील महाविकास आघाडीच्या संदर्भात हे विधान केले आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी उद्योगपती गौतम अदानींच्या मुद्द्यावरुन त्यांनी वेगळी भूमिका घेतली होती. त्यानंतर गौतम अदानी यांनी पवारांची भेट घेत त्यांच्याशी 2 तास चर्चा केली होती. त्यामुळे शरद पवार हे आगामी काळात काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Video : मविआ फुटणार! पवारांच्या विधानाला महत्त्व अन् गांभीर्य; CM शिंदेंचं सूचक विधान
तसेच भाजपकडून अजित पवारांना फोडण्याचा प्रयत्न होत आहे का? यावर देखील शरद पवारांनी भाष्य केले आहे. कुणी फोडायचं काम करत असेल, त्यांचा तसा काही कार्यक्रम असेल तर ते करत राहतील. आम्हाला जेव्हा यावर ठाम भूमिका घ्यायची असेल तेव्हा ती घ्यावी लागेल. त्यावर आज काही सांगता येणार नाही. कारण याबाबत आम्ही काही चर्चाच केलेली नाही, असेही पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, पवारांचे हे विधान खूप काही सांगून जाते. याआधी 2014 साली देखील त्यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता. त्यानंतर 2019 च्या विधानसभेचा निकाल लागल्यानंतर आम्हाला विरोधी पक्षात राहण्याचा जनतेने कौल दिला आहे, असे विधान त्यांनी केले होते. पण त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाली व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आला. त्यामुळे आता त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत चलबिचल सुरु झाली आहे. यानंतर आगामी काळात राज्याच्या राजकारणात कोणती नवीन राजकीय समीकरणे उदयास येतात ते पाहण महत्वाचे ठरणार आहे.
“राजकारणात पण काही कुस्त्या चालल्या आहेत” व्हिडीओ शेअर करत फडणवीसांचा इशारा कोणाला?