राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडणार? शरद पवारांशी बोलून पक्षांतर करणार
Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) खिंडार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ईडीच्या (ED) रडारवर असलेल्या काही नेत्यांना भाजप (BJP) त्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती राजकीय वर्तुळातून येत आहे. यासाठी भाजपच्या गोटातून जोरदार हालचालींना सुरुवात झाली आहे. या संदर्भात खलबतं होत आहेत.
अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी अस्वस्थाता आहे. ईडीच्या रडारवर असलेले नेते भाजपाच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अशिष शेलार दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या भेटीला गेले आहेत.
आतापर्यंत अजित पवार आणि त्यांचे समर्थक आमदार भाजपात जाणार अशी चर्चा होती. पण यामध्ये अजित पवार यांचा समावेश नसून राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांचा गट बाहेर पडण्याची तयारी करत आहे. वरिष्ठ नेत्यांशी त्यांची चर्चा झाली आहे. केंद्रीय यंत्रणांच्या चौकशा किंवा इतर कारणांनी होणारा त्रास थांबवण्यासाठी भाजपात जाणार असल्याचे त्या नेत्यांचे म्हणणे आहे. लवकरच हा गट भाजपात प्रवेश करणार आहे. बाहेर पडणाऱ्या गटात अजित पवार नाहीत असे राष्ट्रवादीच्या सुत्रांकडून सांगितले जात आहे पण ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पक्षातून बाहेर पडणार आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का असणार आहे.
Manikrao Kokate : अजित पवार जर राष्ट्रवादीतून बाहेर पडले तर पक्षात काहीच शिल्लक राहणार नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून मनधरणी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पण वारंवार चौकशीच्या फेऱ्यात अडकणं याला ते वैतागले आहेत. यासाठी पक्ष प्रवेश केल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही असे त्यांनी सांगितले आहे. थेट शरद पवार यांच्याशी त्यांची चर्चा झाली आहे. पवारांना या पक्षप्रवेशाची कल्पना दिली आहे, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खासगीत सांगितले आहे.