‘हातात सत्ता राहिल वाटत होतं पण..,’; निवडणूक निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
Sharad Pawar News : पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर आज निकाल जाहीर झाला आहे. पाच राज्यांपैकी तीन राज्यांत भाजपने मुसंडी मारल्याचं दिसून येत आहे. राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं आकडेवारीवरुन दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांच्या हातात सत्ता त्यांच्याकडेच सत्ता राहणार असल्याचं वाटत होतं पण जनतेचा नव्या लोकांना संधी देण्याचा मूड असल्याचं विधान शरद पवार यांनी केलं आहे. पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरुन थेट भाष्य केलं आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा निवडणूक निकाल: कोण मारणार चौकार, कोण होणार बोल्ड?
शरद पवार म्हणाले, यापेक्षा वेगळा निकाल लागेल, अशी माहिती आमच्याकडे नव्हती. मागची पाच वर्षे राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे आता नव्या लोकांना संधी द्यावी, असा मूड राजस्थानच्या जनतेचा दिसतो. त्याला साजेसा असा निकालाचा सुरुवातीचा कल असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. तसेच ज्यांच्या हातात सध्या सत्ता आहे. त्यांच्याकडे आताही सत्ता जाईल, असं वाटत होतं. मात्र राहुल गांधी यांची हैदराबादला जाहीर सभेला झालेली गर्दी पाहिल्यानंतर येथे परिवर्तन होईल याची खात्री आम्हाला होती, तसंच झालं असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.
Animal च्या लाटेवर भाजप स्वार; ‘या’ गाण्यावर बनवला मोदींचा खास व्हिडीओ…
ईव्हीएमला दोष देणार नाही :
ईव्हीम मशीनसंदर्भात अद्याप माझ्याकडे कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. त्यामुळे मी आत्ता त्यावर काहीही बोलू शकत नाही. आत्ता ईव्हीएम मशीनला दोष देऊ शकत नसल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.
इंडिया आघाडीची बैठक :
मी पाचही राज्यांत प्रचारासाठी जास्त गेलो नाही. त्यामुळे या पाच राज्यांच्या निकालावर अधिक भाष्य करु शकत नाही. मंगळवारी इंडिया आघाडीची अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंच्या घरी बैठक आयोजित केली आहे. पाच राज्यांच्या जाणकारांकडून आम्हाला माहिती घ्यायची आहे. त्यानंतर सामुदायिक विचार विनिमय होणार असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.
जातिनिहाय जनगणना झाली पाहिजे :
जातिनिहाय जनगणना होणं आवश्यक आहे. त्यानंतरच वस्तुस्थिती काय आहे हे समजणार आहे. आरक्षणाच्या यादीत जे येत नाहीत ते जातिनिहाय जनगणनेनंतर समजणार आहेत. सर्वेक्षणावरुन मागासवर्ग आयोगातील ज्या सदस्याने राजीनामा दिला ते मला भेटले आहेत. त्यांचीही जातिनिहाय जनगणना करावी त्यानंतर पुढचे निर्णय घ्यावे, अशी मागणी असल्याचं पवार यांनी सांगितलं आहे.