कोल्हापुरातील चंदगडमध्ये ‘नोटा’ला बहुमत

कोल्हापुरातील चंदगडमध्ये ‘नोटा’ला बहुमत

कोल्हापूर : जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कागणी गावातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नोटाला सर्वाधिक मतदान मिळालं. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवार शितल अशोक कोरे यांना विजयी घोषित करण्यात आलं आहे. यावर आता अनेकांनी आक्षेप घेतला आहे.

निवडणुकीच्या रिंगणात असलेले कोणीही पसंत नसल्यास मतदारांना ‘नोटा’ म्हणजे वरीलपैकी कोणताच उमेदवार पसंत नसल्याचा पर्याय देण्यात आला आहे. पण जर या नोटालाच सर्वाधिक मतं मिळाली तर? असाच काहीसा प्रकार कोल्हापुरातील चंदगड तालुक्यात घडला आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी नियमानुसार दोन नंबरची मतं घेण्याऱ्या उमेदवाराला विजयी घोषित केलं.

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने NOTA संबंधित कायद्यात सुधारणा केली. नोव्हेंबर 2018 मध्ये राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले की NOTA ला निवडणुकीत सर्वाधिक मतं मिळाल्यास, त्या ठिकाणी पुन्हा निवडणुका घेतल्या जातील. हा आदेश सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका आणि पोटनिवडणुकांसाठी तत्काळ प्रभावाने लागू होईल.

पुनर्निवडणुकीतही जर NOTA ला सर्वाधिक मते मिळाल्यास, NOTA वगळून सर्वाधिक मते मिळालेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला विजयी घोषित केले जाईल. पण राईट टू रिजेक्टचा अधिकार नसल्याने नोटापेक्षा कमी मतं मिळालेल्या उमेदवारांना पुन्हा निवडणूक लढवण्यास प्रतिबंध नाही.

आता वरील नियमानुसार, NOTAला सर्वाधिक मतं मिळाली, त्याला बहुमत मिळालं तरी ग्रामपंचायतीच्या स्तरावर निवडणूक रद्द करता येणार नाही. त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात येईल. हा मात्र तुम्ही शहरात राहायला असाल, महापालिका किंवा नगरपालिकांसाठी मतदान करत असाल, तर मात्र तुम्हाला वरील नियम लागू होऊ शकतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube