जरांगेंनी फोडलेल्या ऑडिओ क्लिप बॉम्बवर प्रतापराव जाधवांचा मोठा दावा, भाजपचं नाव घेत केला वार
मनोज जरांगेंच्या जुन्या ऑडिओ क्लिपमुळे राजकीय चर्चेला नवं वळण मिळालं असून, प्रतापराव जाधवांच्या वक्तव्यानं आणखी प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Prataprao Jadhav : केंद्रीय राज्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते प्रतापराव जाधव यांनी मनोज जरांगे पाटील यांनी विधान परिषद निवडणुकीच्या (Jadhav) एक दिवस आधी दीड वर्षांपूर्वीची ऑडिओ क्लिप समोर आणण्यामागील हेतूची चौकशी करण्याची मागणी केली आहे. एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे मोठे नेतृत्व असून, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असेल तर शिवसैनिकांमध्ये नाराजी निर्माण होणार असल्याचं जाधव यांनी म्हटलं आहे. संबंधित क्लिपमध्ये भाजपच्या नेत्यांची नावं असतील, तर भाजपनेच सर्वात आधी या प्रकरणाची चौकशी करावी, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
विदर्भातील मराठा आणि ओबीसी समाजातील बहुतांश लोकांनी जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध न करता पाठिंबा दिल्याचं जाधव यांनी सांगितलं. ओबीसींची संख्या वाढल्यास विदर्भातील ओबीसी समाजातील मुलांच्या संधींवर परिणाम होण्याची शक्यता असतानाही सामाजिक बांधिलकीतून आंदोलनाला पाठिंबा दिला, असं ते म्हणाले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर समाजातील वेगवेगळ्या घटकांनी समन्वयाने भूमिका घेण्याची गरज असल्याचं सांगत त्यांनी आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्याची बाजू स्पष्ट केली.
क्लिपमागचं सत्य शोधून दाखवा, ऑडिओ बॉम्बवरून मनोज जरांगेंचं फडणवीस-शिंदेंना ओपन चॅलेंज
एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भूमिकेवर टीका करणाऱ्यांनाही जाधव यांनी प्रत्युत्तर दिलं. भाजपला सत्तेत आणण्यात शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांची भूमिका महत्त्वाची होती, असा दावा त्यांनी केला. महाराष्ट्रात कमी आमदार असतानाही भाजपने शिंदे यांना मुख्यमंत्री केलं नाही, तर बिहारमध्ये कमी आमदार असूनही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करण्यात आलं, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. प्रवीण दरेकर यांना आक्षेप घ्यायचा असेल, तर त्यांनी एनडीएच्या नेतृत्वाच्या निर्णयावर आक्षेप घ्यावा, असंही जाधव म्हणाले.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढल्यामुळे यश मिळालं, असं सांगत जाधव यांनी मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाचं श्रेयही शिंदे यांना दिलं. शिंदे यांच्यासोबतच खासदार श्रीकांत शिंदे यांनाही बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस जनाधार मिळवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा आधार घेत असल्याची टीकाही त्यांनी केली. या प्रकरणातील सत्य जनतेसमोर यावं आणि ऑडिओ क्लिपमधील आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी जाधव यांनी केली.