भाजपचे OBC प्रेम हे पुतनामावशीचे; हरी नरकेंचा भाजपवर हल्लाबोल

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 27T113625.533

राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला असे म्हणत भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यभरामध्ये भाजपने राहुला गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी यासाठी आंदोलन केले आहे. यावरुन प्रा. हरी नरके यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपचे ओबीसी प्रेम हे पुतनामावशीचे असल्याचे नरके म्हणाले आहेत.

भाजपाकडून सध्या ओबीसी प्रेमाची नौटंकी चालू आहे. हे पुतनामावशीचे प्रेम सध्या उफाळून का आले आहे? ज्यांनी आजवर ओबीसीचा सतत द्वेष केला, आर्थिक व शैक्षणिक कत्तल केली त्यांना आज ओबीसीचा एव्हढा पुळका का आलाय? गेल्या आठनऊ वर्षातले यांच्या सरकारचे प्रत्येक पाऊल ओबीसीविरोधी होते. आहे. ओबीसी विद्यार्थ्यांचा हक्काचा स्कॉलरशिपनिधी भाजप सरकारने उच्च जातीतील गरीबांकडे वळवला. (EWS) मुळात तो इतका तुटपुंजा होता की दरडोई दरवर्षी ₹२२ म्हणजे महिन्याला दिड ते पावणेदोन रुपये. अशी घनघोर चेष्टा करणारे कोणत्या तोंडाने ओबीसीबद्दल बोलत आहेत? अशा शब्दात त्यांनी भाजपला खडे बोल सुनावले आहेत.

उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त; हर्षवर्धन पाटलांचा ठाकरेंवर निशाणा

ओबीसींचा विकास रोखून धरण्यासाठी ओबीसी जनगणना रोखणाऱ्या मोदी सरकारला ओबीसीबद्दल बोलायचा अधिकारच नाही. रोहिणी आयोग नेमून ज्यांनी ओबीसीचे तुकडे केले त्यांनी ओबीसीबद्दल बोलावे? यांना ओबीसी vote bank हवीय पण ओबीसी सक्षम व्हायला नकोय. तो गुलामच राहायला हवाय. कारण मनुस्मृतीत म्हटले आहे, शूद्र कर्तबगार झाले तर उच्च जातीय त्यांचे शोषण करू शकणार नाहीत. ते उच्च जातींची गुलामी करणार नाहीत.(मनुस्मृती, १०:१२९)

म्हणून तर मंडल आयोग उधळून लावण्यासाठी अडवाणींनी रथ यात्रेचे पाऊल उचलले. व्ही.पी. सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला. तेव्हा बिजेपीचे राज्यातील नेते धरमचंद चोरडिया मला म्हणाले होते, ओबीसी ही आमची धार्मिक हक्काची मतपेढी आहे.मंडल आयोग लागू करून व्हीपी ती पळवणार असतील तर आम्ही सरकार पाडू. मंडल आयोगाला संपूर्ण विरोध करूनही बुद्धिभेद आणि खोटा प्रचार यांच्या जोरावर भाजपने ओबीसी votebank टिकवून ठेवली. अर्थात त्याला काँग्रेसचा करंटेपणाही तितकाच जबाबदार आहे. पण त्यावर वेगळे लिहितो.

सोमय्यांनी केला 12 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, राज्यपालांनी दिला ‘स्पिरिट ऑफ मुंबई’ पुरस्कार

मोदी हे नावाला ओबीसी.पण त्यांचा अजेंडा संपूर्ण उच्चजातीय धार्जिणा. व्यक्ती कोणत्या जातीची आहे याला महत्व नाही.तिचा अग्रक्रम कशाला आहे, सरकार बजेट कशावर खर्च करते हे महत्वाचे. ओबीसी आरक्षण संपवण्यासाठी संघ भाजप प्रत्येक पावलावर कट कारस्थाने करते नी पुन्हा आपणच ते मिळवून देऊ अशी प्रचार यंत्रणा राबवून श्रेयही घेते. ओबीसीला सतत भ्रमित करून वापरून घेते.

ललित मोदी, नीरव मोदी हे आर्थिक घोटाळेबाज गुन्हेगार आहेत. गुन्हेगाराला जात धर्म नसतो. त्याला कायदा आणि घटनेप्रमाणे शिक्षा व्हायला हवी. ते ओबीसी आहेत असे सांगणे हाच ओबीसींना बदनाम करण्याचा कपट अजेंडा आहे

Tags

follow us