Rohit Pawar Vs Ram Shinde : राम शिंदे, तुम्ही बारामतीत उभे राहून दाखवा!
अहमदनगर : कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध शिंदे गटात राजकारण तापल्याच पाहायला मिळालं आहे. याच पार्श्वभूमीवर आता आमदार रोहित पवार यांनी आमदार राम शिंदे यांना टोला लगावला आहे. राम शिंदे यांनी बारामती लोकसभेसाठी उभं राहावं, असं म्हणत रोहित पवार यांनी राम शिंदे यांना थेट आव्हान दिलं आहे.
राम शिंदे यांना एवढा आत्मविश्वास असेल तर त्यांनी बारामतीत उभं राहून दाखवावं, असं रोहित पवार यांनी नगरमध्ये माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरून सुद्धा रोहित पवार यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री दावोसला गेले आहे. त्यामुळे अपेक्षा करूया की जे प्रकल्प निवडणुकांसाठी गुजरातला गेले आहे. ते महाराष्ट्रात येतील,असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
सत्यजित तांबे यांच्या उमेदवारी बाबत त्यांनी सांगितले की, काँग्रेसचा हा अंतर्गत वादा असून कोणाला उमेदवारी द्यायची किंवा नाही द्यायची याबाबत त्यांनी चर्चा करुन विषय संपविला पाहिजे होता. मात्र तो संपला नाही. सर्वांनी एकत्रित बसून एक निर्णय घ्यायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध शिंदे असा राजकीय कलगीतुरा नेहमीच रंगलेला असतो. नुकतचं काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजित तांबे यांची भाजपच्या नेत्यांसोबत बैठक घडवून आणण्यासाठी आमदार राम शिंदे यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा होती. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांना टोला लागवला होता.
सत्यजित तांबे आणि डॉ. सुधीर तांबे हे कोणताही निर्णय घेण्याला सक्षम आहेत. त्यांना कुठलीही बैठक करण्याची गरज नाही, असा टोला राम शिंदे यांना रोहित पवार यांनी लागवला होता.