राऊत हे शकुनी मामा… सेना पवारांनीच फोडली; राम शिंदेचे गंभीर आरोप
अहमदनगर : निवडणूक आयोगाने (Election Commission) शिंदे गट हाच अधिकृत शिवसेना पक्ष असल्याचा निकाल दिल्यामुळे धनुष्यबाण (DHANUSHYABAN) हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले. आयोगाने दिलेल्या निकालावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा लोकशाहीवर घाला आहे, अशा प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) विरोधकांकडून येत आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य म्हणजे नाचता येईना अंगण वाकडं असं आहे, तुमच्या बाजूने निकाल लागला तर निवडणूक आयोग चांगला. तुमच्या विरोधात निकाल लागला तर निवडणूक आयोग वाईट हे सर्व जनता पाहत आहे, असं वक्तव्य भाजप आमदार राम शिंदे (BJP MLA Ram Shinde) यांनी केलं आहे.
शिवसेना हे नाव आणि चिन्ह हे शिंदे गटाला मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना निवडणूक आयोग बरखास्त केला पाहिजे असं म्हटलं होतं. त्यावर भाजप प्रवक्ते राम शिंदे यांनी हे उत्तर दिलं आहे. निवडणूक आयोग ही सर्वोच्च संस्था आहे. निवडणूक आयोगाने सर्व नियम आणि अटी पाहून हा निकाल दिला आहे, असं राम शिंदे यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य म्हणजे नाचता येईना अंगण वाकडं असं आहे, अशीही टीका यावेळी बोलतांना त्यांनी केली. तुमच्या बाजूने निकाल लागला तर निवडणूक आयोग चांगला. तुमच्या विरोधात निकाल लागला तर निवडणूक आयोग वाईट हे सर्व जनता पाहत आहे, असं शिंदे म्हणालेत.
दरम्यान, शिवसेना फोडण्याचा यापूर्वी अनेक वेळा प्रयत्न झाला. शरद पवार यांनी देखील शिवसेना फोडली असा गंभीर आरोप राम शिंदे यांनी केला. ते म्हणाले, छगन भुजबळ हे देखील शिवसेनेतून फुटून आज ते शरद पवार यांच्या जवळ आहेत. एकनाथ शिंदे नेतृत्वाखाली शिवसेनेत सर्वात मोठ्या स्वरूपात बंड करण्यात आले. या बंडामुळे शिवसेनेची आणि हिंदुत्वाची विचारधारा असलेले लोकं एका बाजूला आले आहेत. त्यामुळे खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप आणि शिवसेनेची फाटाफूट करण्यात मोठा हात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचा आहे. त्यामुळे तेच खरे शकुनी मामा आहे, असा खोचक टोलाही राम शिंदे यांनी लगावला आहे.
शिंदे म्हणाले, संजय राऊत हे या महाराष्ट्रातल्या राजकारणातले शकुनीमामा असून त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही आहे. राऊत हे जे काही बोलत आहेत, त्याला कुठलाही आधार नाही आहे. आज शिवसेनेची जी काही अवस्था आहे, ती राऊतांमुळेच झाली आहे. त्यांनी बोलून बोलून शिवसेनेचा पूर्ण कार्यक्रम लावलेला आहे. त्यांनी शिवसेनेत राहून राष्ट्रवादीचे काम केलं आहे, असंही राम शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरेंना अनेक जण सोडून गेले पण शंकरराव गडाख सोबत राहिले ….
दरम्यान, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हटलं होतं की, पहाटेच्या शपथविधी वेळी अजित पवार हे आमदारांच्या सह्यांचे पत्र घेऊन आले होते. त्यावर राम शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, की त्यावेळी सरकार स्थापन होत असताना राज्यपाल कोश्यारी यांनी त्यांना आलेला अनुभव विशद केला आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो घटनाक्रम सांगितला त्यावरून जर अजित पवार हे शरद पवारांना न विचारता भाजप सोबत पहाटेचे सरकार स्थापन करायला गेले असते तर पुन्हा त्यांना उपमुख्यमंत्री केलं नसतं. त्यामुळे भाजपसोबत असताना देखील ते उपमुख्यमंत्री झाले आणि महाविकास आघाडी सोबत असताना देखील उपमुख्यमंत्री झाले. याचा अर्थ हे सर्व प्रकरण शरद पवार यांच्या आशीर्वादानेच केलं, असं राम शिंदे म्हणाले