राजीनामा द्या अन् निवडणूक लढवून दाखवा, शिवतारेंचे राऊतांना थेट आव्हान
पुणे : ‘आम्हाला कचरा म्हणता? हिंमत असेल तर 12 तासाच्या आत खासदारकीचा राजीनामा द्या. उगाच बाष्कळ बडबड करू नका. राजीनामा द्या. मग तुम्हाला तुमची लायकी कळेल.’ बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते विजय शिवतारे यांनी अशी टीका संजय राऊत यांच्यावर केली.
नाशिकमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या 50 पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. प्रवेश करणाऱ्यांमध्ये ठाकरे गटाचे विभागप्रमुख आणि तालुका प्रमुख होते. या प्रवेशानंतर ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी ‘सर्व चोर, लफंगे शिंदे गटात गेले आहेत. हा कचरा होता. पानगळ होती. ती शिंदे गटात गेलीय’, अशी जोरदार टीका केली होती.
आम्हाला कचरा म्हणणाऱ्या संजय राऊत यांचा जन्म सुद्धा इथेच झालेला आहे. ज्यांना तुम्ही कचरा म्हणत आहात त्याच आमदार आणि खासदारांच्या जीवावर तुम्ही राज्यसभेत पोहोचलेले आहात. आता हे सर्वजण तुम्हाला तेवढाच कचरा वाटत असतील तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि निवडून येऊन दाखवा. उगाच उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं संजय राऊत करत आहेत. जरा निवडणुकीला उभे राहून दाखवा म्हणजे तुम्हाला तुमची लायकी कळेल. असा घणाघाती टोला विजय शिवतारे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
संजय राऊत यांनी अशा पद्धतीने वक्तव्य करण्यापेक्षा. उद्याच्या उद्या 12 तासाच्या आत खासदारकीचा राजीनामा द्या उगचची बाष्कळ बडबड करू नका. आता तुमच्या चेहऱ्याचा सुद्धा महाराष्ट्राला वीट आला आहे. ज्या आमदार खासदारांच्या जीवावर तुम्ही निवडून आलेला आहात त्यांच्याबद्दल वाईट वक्तव्य करत असाल तर आधी तुम्ही राजीनामा द्या आणि महाराष्ट्रातून कुठूनही निवडून येऊन दाखवा. तुम्हाला तुमची लायकी कळेल. असे शिवतारे म्हणाले आहेत.