‘मलाही ईडीची नोटीस येऊ शकते’; रोहित पवाराचं मोठं विधान
Rohit Pawar : राष्ट्रवादीत (NCP) बंडाळी करत अजित पवार (Ajit Pawar) आणि समर्थक आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेत. अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यासारखे दिग्गज नेत्यांनी जर शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडली तरी रोहित पवार (Rohit Pawar) हे शरद पवारांसोबत खंबीरपणे उभे आहेत. नुकताच त्यांनी मराठवाड्याचा दौरा करून संघटन मजबुत करण्यावर भर दिला दरम्यान, आम्ही विचारांबरोबर राहून संघर्ष करण्याचं ठरवल्यानं केद्रीय एजन्सींजकडून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली जाईल. मलाही ईडीची नोटीस येऊ शकते, असं विधान रोहित पवार यांनी केलं.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, आम्ही विचारांबरोबर टिकून राहण्याची आणि संघर्ष करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप किंवा इतर एजन्सी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर कारवाई करू शकतात. कोणतीही कारवाई झाली तरी आम्ही शरद पवार आणि महाराष्ट्र धर्माबरोबर राहू, असे रोहित पवारांनी स्पष्ट केले.
ईडीची नोटीस येऊ शकते का? या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले, नोटीस आली आहे की येणार आहे, याबाबत मी बोलणार नाही. पण, ईडीची नोटीस येऊ शकते. मात्र, तरीही मी महाराष्ट्रातील जनतेच्या बाजूने उभा राहीन. मी शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. केवळ मी एकटाच पवार साहेबांसोबत आहे, असं नाही. राज्यातील असंख्या कार्यकर्ते-पदाधिकारी त्यांच्या सोबत आहेत, असं रोहित यांनी सांगितलं.
नगरच्या कलाकाराची कलाकृती अयोध्येत झळकणार
अजित पवार-शरद पवार यांच्यात गुप्त भेट झाली. त्यामुळं पवारांविषयी संभ्रम निर्माण होत आहे, यावर बोलतांना रोहित पवारांनी सांगितलं की, शरद पवार हे राजकीय भूकंपासाठी ओळखले जातात. राजकीय खेळी खेळण्यात ते निष्णात आहेत. त्यामुळे अजित पवार जेव्हा भापजसोबत गेले तेव्हा अनेकाना वाटलं की यात पवारांच हात आहे. पण आता जसा वेळ निघून जात आहे. तसं लोकांना कळत आहे की ही पवार साहेबांची खेळी नाही. शरद पवार हे वेळोवेळी आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आता कोणताही संभ्रम नाही,असं त्यांनी सांगितलं.
शरद पवार 60 वर्षांपासून राजकारणात असल्याने मुळावर घाव घालू लागले आहेत. शरद पवार जेव्हा भाजपच्या विरोधात बोलतात तेव्हा ते संदेश देतात की, तिकडे गेलेले नेते महत्वाचे नाहीत. महत्वाचं भाजप आहे. जो आपला विचार नष्ट करू पाहत आहे. आपला विचार संपवणाऱ्या भाजपवर बोललं पाहिजे, असं रोहित यांनी सांगितलं.