RSS : जातनिहाय जनगणनेला ‘संघाचा’ विरोध; भाजप अन् शिंदेंच्या आमदारांसमोरच स्पष्ट केली भूमिका
RSS : एकीकडे देशभरात जातनिहाय जनगणनेची मागणी जोर धरत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) मात्र या जात निहाय जनगणनेला विरोध दिसत आहे. कारण मंगळवारी झालेल्या नागपूरमधील संघाच्या कार्यक्रमानंतर विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी जातनिहाय जनगणनेवर आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी जात आधारित जनगणनेची गरज नाही. असं स्पष्ट म्हटलं आहे.
काय म्हणाले श्रीधर गाडगे?
जात आधारित जनगणनेची गरज नाही. कारण एकीकडे आम्ही जातीचा उहापोह करणार, जातीनिहाय गणना करणार आणि दुसरीकडे म्हणणार की जातिभेद नष्ट बस झाला पाहिजे. जर जात विस्मरणात जात असेल विस्मरणात जाऊ द्या. कारण जात ही कोणी निर्माण करत नाही ते जन्मापासून माणसाला मिळत असते. त्याच्यामुळे तिचा मोजदाद करणे आणि मग त्याच्यावरून भांडण निर्माण करणे, देश कमजोर करणे हे काही योग्य नाही. जातीचा विचार पण संघ करत नाही. म्हणून संघाची जातीय जनगणनेची गरज नाही, अशी भूमिका आहे. लोकप्रतिनिधींकडूनही अशी मागणी होऊ नये अशी अपेक्षा आहे, असे मत विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी व्यक्त केली.
नागपूर हिवाळी अधिवेशनकाळात दिवंगत केशव बळीराम हेडगेवार यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘रेशीमबाग’ येथील स्मृतीमंदिरात भाजपचे आमदार आणि खासदार संघ मुख्यालयात जातात. यंदा भाजप आमदार आशिष शेलार यांच्यावतीने शिवसेना आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदारांनाही निमंत्रण पाठविले होते. यानुसार दोन्ही पक्षाच्या बहुसंख्य नेत्यांनी हजेरी लावली होती.
दरम्यान राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा तिढा सुटलेला नसतानाच आता शिंदे-फडणवीसांसोबत नव्याने संसार थाटलेल्या अजित पवारांनी (Ajit Pawar)सरकारकडे मोठी मागणी केली आहे. महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करा अशी मागणी अजितदादांनी केली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नुकतेच बिहारमध्ये (Bihar)करण्यात आलेल्या जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर अनेक राज्यांतून अशाप्रकारची जातगणना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, भाजप अशा प्रकारच्या जनगणनेला फारसं इच्छूक नसून, नव्याने सत्तेत सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच अशाप्रकारची जनगणना करण्याची मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.