संभाजी राजे शोधताय नाशिकमध्ये सुरक्षित मतदार संघ?
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी
नाशिक (Nashik)शहरात आज भाजप (BJP)कार्यकारिणीची बैठक सुरु आहे. या बैठकीच्या निमित्तानं शहरात बॅनरबाजी सुरु आहे. झेंडे, बॅनरबाजीमुळं शहर भाजपमय झालं आहे. अशा वातावरणात स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी राजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati)यांच्या वाढदिवसानिमित्त दौरा, तसेच त्यांच्या शुभेच्छा बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून संभाजी राजे यांचं नाशिकवर विशेष लक्ष आहे. हे लक्ष नाशिक लोकसभा मतदार संघावर (Nashik Lok Sabha Constituency)आहे का? या बाबतही चर्चा रंगू लागल्या आहेत. कारण तसंच आहे.
नाशिक लोकसभा हा मराठा बहुल मतदार संघ आहे. नाशिक लोकसभा मतदार संघात नाशिक पूर्व-भाजप, नाशिक मध्य – भाजप, नाशिक पश्चिम भाजप, देवळाली – राष्ट्रवादी, सिन्नर – राष्ट्रवादी, इगतपुरी हा मतदार संघ काँग्रेसकडं आहे. या मतदार संघात 35 टक्के मराठा बहुल, त्यानंतर वंजारी, माळी असे ओबीसी, आदिवासी, मुस्लिम, दलित अशी विभागणी आहे.
मराठा, दलित, मुस्लिम आणि आदिवासी हे गणित कायम राहात मतदार संघात गेल्या सात टर्ममध्ये सहा वेळा मराठा खासदार राहिले आहेत. सध्या खासदार हेमंत गोडसेविषयी नाराजी आहे. अॅन्टी इनक्कंबनशी, ठोस काम कुठलं नाही, ठाकरे गटाला असलेली सहानुभूती ही गोडसे यांची मोठी डोकेदुखी बनली आहे.
सेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आल्यास गोडसे कमकुवत पडतील असं चित्र आहे. अशा परिस्थितीत भाजप हा मतदार संघ भाजपला सोडेल अशी शक्यता कमी आहे. ही पार्श्वभूमी संभाजी राजे यांना स्वतःसाठी अनुकूल वाटत आहे. मात्र संभाजी राजेंना मराठा मत मिळतील, असं गणित लावलं जातं. पण स्थानिक उमेदवार नसल्यानं नाराजी वाढेल.
BJP : अन् भाजप कार्यकारिणीत निघाली अनेकांच्या मनातली खदखद.. ; पहा, काय घडले ?
मराठा समाजातील मोठे नेते अजून त्यांच्याजवळ नाहीत. काही नेते आहेत पण जनतेत प्रतिमा नाही. शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी किंवा भाजप उमेदवारी देईल अथवा पाठिंबा देईल अशी राजेंना आशा वाटणं स्वाभाविक आहे. दुसरीकडं राष्ट्रवादीने नितीन ठाकूर यांना लॉंच केले. मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस आहेत.
सौम्य स्वभाव, अराजकीय व्यक्तिमत्त्व, शांत उपद्रवमुल्य नाही, सर्वपक्षीय संबंध ही त्यांची जमेची बाजू आहे. मराठा चेहरा आणि भुजबळ समर्थक अशी दुहेरी बाजू त्यांना आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कोणीही आमदार या लोकसभा मतदार संघात नाही. पण त्यांना मानणारा मोठा वर्ग येथे आहे. हे जिथे उभे राहतील तिथे उमेदवार निवडून येईल हे नक्की. अशा परिस्थितीत संभाजी राजे छत्रपती यांना नाशिकचा राजकीय कसारा घाट चढणं सध्या कठीण आहे.