निवडणूक आयोगाच्या निर्णयावर छत्रपती संभाजीराजेंची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने आता तरी..
Election Commission : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना (Shivsena) हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. आयोगाचा हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्यासाठी धक्कादायक असून यामुळे त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीत अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे या निर्णयावर राजकीय वर्तुळातून सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. या निर्णयावर खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ‘आयोगाने घेतलेला हा निर्णय लोकशाहीचा भाग आहे. ज्यांना जे नाव आणि चिन्ह मिळाले, त्यांना आमच्या शुभेच्छा.’ ‘माझ्या दृष्टीने म्हणाल तर लोकांना याचे किती देणेघेणे आहे हे माहिती नाही. त्यांचे प्रश्न कधी सुटणार हे महत्वाचे आहे. गेल्या दोन वर्षात अस्थिर सरकार पाहिले तर लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत. आता माझे म्हणणे आहे की सरकारने लोकांचे प्रश्न सोडवावेत. मी जे काही प्रश्न घेऊन जातो ते देखील सुटत नाहीत,अशी सध्या परिस्थिती आहे,’ असे त्यांनी सांगितले.
हे वाचा : शिवसेना आणि धनुष्यबाण दोन्ही एकनाथ शिंदे गटाचे : भाजपने ठाकरेंना पॉलिटिकली चिरडले
‘आपल्याकडे लोकशाहीत एक कार्यपद्धती आहे. त्यानुसार सगळे चालते. निवडणूक आयोग स्वतंत्र आहे, त्यामुळे त्यावर आधिक भाष्य करणे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व त्यांच्या गटाला या निर्णयात अन्याय वाटत असेल तर ते वरिष्ठ न्यायालयात दाद मागतील. आम्हाला मात्र यामध्ये काही देणेघेणे नाही. फक्त सामान्य माणसांचे प्रश्न सुटावेत, असे आम्हाला वाटते. राष्ट्रवादीत (NCP) धुसफूस आहे. काँग्रेसचे (Congress) आधीचे वलय राहिलेले नाही. भाजपमध्ये (BJP) अंतर्गत विरोध आहे. त्यामुळे भविष्यात स्वराज्यला चांगले दिवस आहेत,’ असे त्यांनी सांगितले.
भुजबळ अनुभवी
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) हे अनुभवी आहेत. मला तितका अनुभव नाही. आम्ही त्यादृष्टीने नवीन आहोत. भुजबळ अनुभवी असल्याने ते बोलत आहेत, अशा शब्दांत त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर भुजबळ यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर उत्तर दिले.
—
मी खासदारकीची निवडणूक लढवावी असे केवळ नाशिककरच नाही तर कोल्हापूर आणि अन्य शहरांतील लोकही म्हणत आहेत. विदर्भात जरा कमी आहे. अजून तिथे गेलो नाही त्यामुळे तेथील परिस्थिती माहिती नाही. माझे नाशिकचे दौरे आताच वाढले आहेत असे नाही याआधीही माझे दौरे सुरुच होते, पण प्रसारमाध्यमांच्या ते लक्षात आले नाही, इतकेच.