Sangli Satara MLC Election : जयकुमार गोरेंना धक्का ! सातारा-सांगलीत महायुतीची मते कशी फुटली ?
Sangli Satara MLC Election-आजच्या मतमोजणीत भाजपचे (BJP) उमेदवार धैर्यशील कदम यांनी सहज विजय मिळविला. परंतु महायुतीचे शंभरहून अधिक मते फुटली आहे.
Sangli Satara MLC Election: सातारा-सांगली विधान परिषदेची (Sangli Satara MLC Election) निवडणूकही गाजली. संख्याबळ नसतानाही महाविकास आघाडीने तगडा उमेदवार देऊन आव्हान उभे केले होते. परंतु आजच्या मतमोजणीत भाजपचे (BJP) उमेदवार धैर्यशील कदम (Dhairyasheel Kadam)यांनी सहज विजय मिळविला. परंतु महायुतीचे शंभरहून अधिक मते फुटली आहे. तब्बल पाच मंत्र्यांनी फिल्डिंग लावूनही महायुतीचे शंभर मते का फुटली ? महायुतीमध्ये कोण नाराज आहे हेच पाहुया…
सातारा-सांगली विधानपरिषदेसाठी सोमवारी मतमोजणी झाली. त्यात मंत्री जयकुमार गोरे यांचे निकटवर्तीय धैर्यशील कदम यांना 885 पैकी 593 मते मिळाले. तर महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अभयसिंह जगताप यांना 292 मते मिळाली. 9 मते अवैध ठरली आहेत. त्यामुळे धैर्यशील कदम यांचा विजय झाला आहे. परंतु महायुतीचे शंभर होऊन अधिक मते फुटली आहे.
झेडपी संघर्षामुळे होती धाकधूक…
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद निवडणुकीत मोठा राजकीय संघर्ष झाला होता. राष्ट्रवादी-शिवसेना यांनी एकत्र येऊन अध्यक्षपद मिळविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु शेवटी मंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपचा अध्यक्ष करून दाखविला होता. त्यामुळे साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील हे नाराज झाले होती. झेडपीचा बदला घेण्याची संधी असल्याची गळ काही झेडपी सदस्यांनी दोन्ही मंत्र्यांना घातली होती. त्यामुळे वेगळ्या राजकीय घडामोडी घडण्याच्या शक्यता होती. विशेष म्हणजे देसाई, मकरंद पाटील हे महायुतीचे उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी गैरहजर राहिले होते. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे अभयसिंह जगताप हे तगडे उमेदवार होते. त्यांनी राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेतील नाराज सदस्यांना आपल्याकडे खेचण्याची रणनिती आखली होती. परंतु शेवटच्या टप्प्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनी यांनी आपल्या मंत्र्यांना महायुतीचे उमेदवारांचे काम करण्याची सूचना दिल्या होत्या. त्यानंतर शंभूराज देसाई, मकरंद पाटील यांनी महायुतीचे काम सुरू केले होते.
पाच मंत्री लागले कामाला
सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री मकरंद पाटील, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले असे पाच मंत्री, खासदार उदयनराजे भोसले, आमदार डॉ. अतुल भोसले यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. कुठेही दगाफटका होऊ नये म्हणून खबरदारी घेतली होती.
शंभर मते कोणाची फुटली ?
महायुतीचे मंत्री, खासदार यांनी जोरदार फिल्डिंग लावूनही अभयसिंह जगताप यांनी महायुतीचे शंभर मते फोडली आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे हे मते असल्याचे राजकीय चर्चा आहे. यातून मंत्री जयकुमार गोरे यांना एक धक्का दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता विधानपरिषदेत फुटलेल्या मतावरून महायुतीमध्ये वेगळे राजकारण सुरू होऊ शकते हे नक्की.