Sharad Pawar Retirement : सुप्रिया की, अजित पवार; NCP चा पुढचा अध्यक्ष कोण?, पवारांनी खुर्ची का सोडली?
Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडण्याची घोषणा आज (दि. 2 मे 2023) केली आहे. यावेळी शरद पवारांनी निवृतीची घोषणा करताना अनेक गोष्टींवर भाष्य केले. काही दिवसांपूर्वी पवारांनी भाकरी फिरवण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आज त्यांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात थेट निवृत्तीची घोषणा केली. पवारांच्या या घोषणेनंतर आता राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष कोण? आणि पवारांनी एवढा मोठा निर्णय का घेतला याची चर्चा आता सुरू झाली आहे. पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे.
Sharad Pawar Retirement : अजित पवार म्हणाले, “रडारड करू नका, हे कधी ना कधी होणार होतं..”
शरद पवार काय म्हणाले?
लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात पवारांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडत असल्याचे जाहीर केले. मात्र, आपण सामाजिक जीवनातून संन्यास घेत नसून, मी सार्वजनिक सभा आणि कार्यक्रमांना उपस्थित राहीन. मी पुणे, बारामती, मुंबई, दिल्ली किंवा भारताच्या कोणत्याही भागात असो, मी नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी उपलब्ध असेल असे पवारांनी यावेळी सांगितले. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन. लोकांचे प्रेम आणि विश्वास हाच माझा श्वास आहे. पवार पुढे म्हणाले, ‘पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी मला दीर्घकाळ मिळाली. अध्यक्षपदाची जबाबदारी मी अनेक वर्षे सांभाळली. ही जबाबदारी दुसऱ्या कोणीतरी घ्यावी अशी माझी इच्छा आहे. आता मी अध्यक्षपदावरून निवृत्ती घेत आहे.
Sharad Pawar Retirement : समिती जनभावनेच्या आधारावर निर्णय घेईल; अजितदादांना विश्वास
पवारांनी हा निर्णय का घेतला?
‘महाराष्ट्राच्या राजकारणातील हा मोठा निर्णय आहे. महाराष्ट्रात शरद पवारांचे नाव खूप मोठे आहे. याशिवाय ते देशाचे मोठे नेते आहेत. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा जाहीर करणे हाही मोठा राजकीय संदेश आहे. अध्यक्षपद सोडण्यामागे काही कारणे असल्याचे मत काही जाणकार राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.
1. पक्षांतर्गत विरोधाचा सूर
2019 मध्येच पक्षाच्या अनेक नेत्यांना भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र सरकार बनवावे असे वाटत होते. मात्र, शरद पवारांनी तसे केले नाही. यानंतर त्यांचे पुतणे अजित पवार यांनी पक्षाच्या निर्णयापासून फारकत घेत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर अजित उपमुख्यमंत्री झाले. मात्र, एका दिवसानंतर त्यांनी राजीनामा दिला. यानंतर पवारांच्या सांगण्यावरून काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून महाविकास या आघाडीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. एवढेच नव्हे तर, गेल्या काही काळातही पक्षाच्या अनेक नेत्यांनी भाजपसोबत येण्याचा सल्ला दिला होता.
Sharad Pawar Retirement : राजीनामा देण्यापूर्वीच शरद पवारांचं संपूर्ण भाषण, जसच्या तसं
2. स्वत:ची ताकदीची चाचणी घेण्यासाठी
असादेखील अंदाज व्यक्त केला जात आहे की, पक्षांतर्गत विरोध आणि पुतणे अजित पवार यांच्या बंडखोरीच्या हालचालींमध्ये शरद पवारांना त्यांच्या स्वतःच्या ताकदीची चाचणी घ्यायची असल्याचे त्यांनी अशा स्वरूपाचा निर्णय घेतला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांनी स्थापन केलेल्या पक्षात आज किती लोक त्यांच्या पाठीशी उभे आहेत हे त्यांना पहायचे असेल हेदेखील यामागचे कारण असू शकते. निवृत्तीनंतर अनेक नेत्यांकडून पवारांची मनधरणी सुरू असल्याचे पाहण्यात येत आहे. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनीही दोनदा शिवसेनाप्रमुखपद सोडले होते आणि नंतर नेत्यांच्या आग्रहास्तव पुन्हा पदभार स्वीकारला होता. त्यामुळे पवार आता काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
3. कौटुंबिक कलह संपवण्यासाठी
राष्ट्रवादीवरील वर्चस्वासाठी पवारांच्या घरात लढा सुरू आहे. एका बाजूला शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे तर दुसरीकडे त्यांचे पुतणे अजित पवार. अशा स्थितीत पक्षातील सत्तेबाबत कुटुंबात कलह निर्माण झाला आहे. या निर्णयातून कौटुंबिक वाद संपुष्टात आणण्याचा प्रयत्न शरद पवार करत असल्याची शक्यता आहे.
पुढचा अध्यक्ष कोण?
1. अजित पवार : शरद पवार यांचे पुतणे आणि महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे नाव यासाठी प्रथम येते. अजित पवार हे अध्यक्ष पदासाठीचे सर्वात मोठे दावेदार आहेत. पक्षातही त्यांचा दबदबा आहे. खुद्द शरद पवार नसतात तिथे अजित पवारांना पाठवले जाते.
अजितदादांनी 2019 मध्ये पक्षाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली होती. बंडखोरी होऊनही अजित पवार माघारी आल्यावर त्यांना महाविकास आघाडी सरकारमध्येही उपमुख्यमंत्री करण्यात आले. एवढेच काय तर ठाकरेंचे सरकार पडल्यावरही शरद पवारांनी अजितदादांनाविरोधी पक्षनेते केले. अशा स्थितीत अजित पवार यांच्याकडे पक्षाची धुरा येण्याची शक्यता आहे.
Video : तु्म्हाला परस्पर निर्णय घ्यायचा अधिकार नाही; पवारांसमोर बसून जयंत पाटील ढसाढसा रडले
2. सुप्रिया सुळे
शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या दावेदार आहेत. सुप्रिया सुळे एक खंबीर नेत्या असून, बोलण्यात खूप निष्णात आहे. त्यांच्या बोलण्याच्या शैलीवर लोकांचा विश्वास बसतो. सुप्रिया यांनी राष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा स्थितीत सुप्रिया यांच्याकडेच पक्षाची कमान येण्याची शक्यता आहे.
3. तिसऱ्या व्यक्तीची शक्यता किती?
अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील कौटुंबिक कलह कायम राहिल्यास शरद त्यांच्या विश्वासू नेत्याकडे पक्षाची धुरा सोपवली जाऊ शकते. असे केल्यास पवार कुटुंबातील वादाचे आरोप चुकीचे असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. कारण यापूर्वी काँग्रेसमध्येही घडले आहे. काँग्रेसने मल्लिकार्जुन खर्गे यांना अध्यक्ष केले आहे. मात्र, पक्षाची सत्ता अजूनही गांधी घराण्याकडेच आहे.