Shiv Sena@57 : बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा धगधगता इतिहास…
मुंबई : ज्वलंत हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेना (shivsena) पक्षाचा आज ५७ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९ जून १९६६ या दिवशी १८ जणांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची स्थापना केली. प्रबोधनकार ठाकरे यांच्या हस्ते नारळ फोडून स्थापन झालेल्या या संघटननेने मागच्या ५० वर्षांहून अधिक कालखंडापासून मराठी मनावर अधिराज्य केले. (shivsena party completed 57 years, read whole history)
मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष केला. मराठी अस्मिता, भूमिपुत्रांना नोकऱ्या, हिंदुत्व अशी विविधस्तरावर ही वाटचाल झाली. १९९५ मध्ये शिवसेनेने भाजपच्या साथीने महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकला. त्यानंतर २०१९ साली पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेनेने आपला मुख्यमंत्री बनवला. या प्रवासात शिवसेनेला छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यासारखे बडे नेतेही शिवसेनेतून बाहेर पडले. शुन्यातून उभ्या राहिलेल्या या संघटनेने मोठे बंड पाहिले आणि त्यातून पुन्हा उभं राहतं सत्तेपर्यंत मजल मारली आहे
१९ जून २०२३ रोजी शिवसेना ५७ वा वर्धापनदिन साजरा करत आहे, त्यानिमित्ताने शिवसेनेच्या या वाटचालीतील हे महत्त्वाचे टप्पे…
> १९ जून १९६६ – बाळासाहेब ठाकरेंनी १८ जणांच्या साथीने शिवसेनेची स्थापना केली.
> ३० ऑक्टोबर १९६६ – शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा संपन्न झाला.
> १९६७ – समाजकारणात अग्रेसर असणाऱ्या शिवसेनेने पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली. ठाणे पालिकेचा किल्ला सर करत शिवसेना सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला.
> १९६८ – जोरदार प्रचार करत शिवसेनेने मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उडी घेतली आणि दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून पुढे आला.
> १९७० – लालबागमधील कृष्णा देसाई या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या आमदाराचा खून झाला. संशयाची सुई शिवसेनेवर. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत कृष्णा देसाई यांच्या पत्नीचा पराभव करत वामनराव महाडिक प्रचंड मतांनी विजयी
> १९७१ – मुंबई महापालिकेत काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेचे पहिले महापौर हेमचंद्र गुप्ते यांचा निवड.
> १९७५-७६ – देशव्यापी आणीबाणीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे समर्थन
> १९८७ – विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणुकीवेळी पहिल्यांदाच अधिकृतरीत्या शिवसेनेने हिंदुत्वाची शाल पांघरली.
> १९८९ – महाराष्ट्रात शिवसेना- भाजपची युती.
> १९८९ – शिवसेनेला धनुष्यबाणाचं चिन्ह मिळाले.
> १९९०-९१ – विधानसभेत शिवसेनेचे सर्वाधिक ५२ आमदार निवडून आले. 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मनोहर जोशी यांच्यारुपाने शिवसेनेने पहिल्यांदा विरोधी पक्षनेता बसवला.
> १९९१ – १८ आमदारांच्या मदतीने शिवसेनेत छगन भुजबळ यांचे पहिले ऐतिहासिक बंड.
> १९९५ – शिवसेना-भाजपा युतीची सत्ता महाराष्ट्रात आली. मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री बनले.
> १९९६ – शिवसेनेचे १५ खासदार दिल्लीत निवडून गेले.
> १९९७ – मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात १०३ नगरसेवक निवडून आले. शिवसेनेने पहिल्यांदाच महापालिकेवर एकहाती भगवा फडकविला. आजतागायत शिवसेनेची मुंबई महापालिकेवर सत्ता आहे.
> २००४ – महाबळेश्वरमधील अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी निवड.
> २००५ – माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे शिवसेनेत दुसरे मोठे बंड.
> २००६ – राज ठाकरे यांच्या रुपाने बाळासाहेब ठाकरे यांना घरातूनच धक्का.
> २०१०- आदित्य ठाकरेंची राजकारणात एन्ट्री. युवासेनेची स्थापना, युवासेनेच्या अध्यक्षपदावर आदित्य ठाकरेंची निवड.
> २०१४ – लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे आजवरचे सर्वाधिक १८ खासदार निवडून गेले.
> २०१४ – लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या २५ वर्षांच्या युतीची अखेर.
> २०१४ – देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये शिवसेना सहभागी. शिवसेना दुसऱ्यांदा सत्तेत आली.
> २०१९ – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेना युतीला एकहाती यश.
> २०१९ – आदित्य ठाकरे यांच्या रुपाने पहिल्या ठाकरेंचा विधिमंडळात प्रवेश.
> २०१९ – विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजप-शिवसेना युती तुटली. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडीची स्थापना.
> २०१९ – उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
> २०२२ – शिवसेनेत अभुतपूर्व बंड. तब्बल ४० आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बाजूला झाले.
> २०२२ – उद्धव ठाकरेंचा राजीनामा, एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री झाले.
> २०२२-२३ – शिवसेनेचे ऐतिहासिक धनुष्णबाण चिन्ह आणि पक्षाचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले.