Supriya Sule Hoarding : ‘नाद करायचा नाय, सुप्रियाताई भावी मुख्यमंत्री’
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP ) महिला नेत्या व खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले आहेत. मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयाच्या बाहेर हे बॅनर लावण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांचे देखील भावी मुख्यमंत्री बॅनर लावले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे देखील भावी मुख्यमंंत्री म्हणून पोस्टर लावण्यात आले होते.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाच्या नावासाठी अजित पवार, जयंत पाटील यांची नावे चर्चेत होती. आता महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे यांचे नाव चर्चेत आहे. या पोस्टरवर ‘महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री सुप्रियाताई सुळे, नाद नाय करायचा’ असे पोस्टरवर लिहिण्यात आले आहे. यावरुन पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
(Chandrapur Collector विनय गौडा यांना अटक करण्याचे आदेश, जाणून घ्या काय आहे प्रकरण?)
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जाहीरपणे बोलताना 2024 साली अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचे असे बोलत असतात. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी एका कार्यक्रमात बोलताना अजितदादा जर 5 वर्षे मुख्यमंत्री झाले तर राज्य 25 वर्षे पुढे जाईल, असे वक्तव्य केले होते. तर जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी अर्थमंत्री, जलसंधारण मंत्री म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
तर अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये बोलताना असे म्हटले होते की, 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री पद सोडायला नव्हते पाहिजे. आम्ही शेवटपर्यंत बदल होऊ दिला नसता, या त्यांच्या विधानावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा रंगली आहे. आपापल्या नेत्यांचे समर्थक त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावत आहेत. त्यामुळे ही स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.