माझा घातपात होऊ शकतो, अंधारेंचा गौप्यस्फोट
चंद्रपूर : ठाकरे गटाची धडाडणारी तोफ म्हणून नावाजलेल्या सुषमा अंधारे या नेहमीच आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखल्या जात. नुकतेच त्यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. माझा घात-अपघात होऊ शकतो, अशी भीती शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे.
तसेच अंधारे म्हणाल्या, तुमच्या मागे चौकशी लावण्यासारखं काही नसल्याने तुमचा अपघात होऊ शकतो, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. चंद्रपूर शहरातील प्रियदर्शिनी सभागृहात सुषमा अंधारे यांनी व्याख्यान देतांना त्यांनी हे वक्तव्य केलंय.
यावेळी बोलताना अंधारेंनी सत्ताधाऱ्यांवर कडव्या शब्दात टीका केली. अंधारे म्हणाल्या, महापुरुषांचा अवमान होतो मात्र सरकारी यंत्रणा काहीही करत नाही, ठप्प राहते आणि हे जाणीव पूर्वक केलं जातं. जाणीवपूर्वक महापुरुषांचं प्रतिमा भंजन केलं जातं आहे. सरकारला बहुजनांच्या आणि पुरोगामी विचारांच्या महापुरुषांची ओळख पुसून टाकायची आहे, असा आरोपही अंधारे यांनी केला.
यावेळी अंधारे यांनी महापुरुषांचा अवमान करणाऱ्या नेत्यांवर शाई फेकण्याला पूर्णपणे विरोध केला. ही शाई नेत्यांच्या तोंडावर फेकण्यापेक्षा ती गोळा करा, निवडणूकीत बोटावर लावा आणि अशा लोकांना निवडणूकीत पराभूत करा असं आवाहन सुषमा अंधारे यांनी यावेळी केलं.